जिल्हाधिकाऱ्यांचा जायकवाडी मृतसाठ्यातून मराठवाड्याला पाणी पुरवण्याचा प्रस्ताव

Photo of author

By Sandhya

जिल्हाधिकाऱ्यांचा जायकवाडी मृतसाठ्यातून मराठवाड्याला पाणी पुरवण्याचा प्रस्ताव

नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयावरून पाणी संघर्ष निर्माण झाला असताना नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरक्षण बैठकीचा संदर्भ देत नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग न करता जायकवाडीच्या मृत साठ्यातूनच मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यासाठी नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून ८.६ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे निर्देश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. त्यावरून मराठवाडा विरुध्द नाशिक-नगर पाणीसंघर्ष पेटला आहे.

गंगापूर धरणातून ०.५ टिएमसी पाणी सोडण्यास आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विरोध केला आहे. पाणी सोडण्यास विरोध नाही; परंतू गंगापूर धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने दारणा धरणातून पाणी सोडावे, अशी त्यांची मागणी आहे.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. येत्या ५ डिसेंबर २०२३ रोजी त्यावर न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात दाखल हस्तक्षेप याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे जायकवाडीसाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परंतू यापुर्वीही टंचाई निर्माण झाली असताना मृतसाठ्यातून पाणी उपसण्यास परवानगी असताना नाशिक व नगरच्या पाण्यासाठी हट्ट धरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

त्यातच आता नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना पाठविलेला प्रस्ताव नाशिक व नगरच्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे.

Leave a Comment