PUNE : कोंढवा महामार्गावरील अडथळे काढणार तरी कधी?

Photo of author

By Sandhya

कोंढवा : महामार्गावरील अडथळे काढणार तरी कधी?

कात्रज-कोंढवा-मंतरवाडी या मार्गावर खड्डे तसेच रस्ता अरुंद असल्याने अडथळा येत आहे. शिवाय, या मार्गावर विद्युत खांबही वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. हे दिसत असताना देखील प्रशासन कोणतीच दखल घेत नाही.

अशा अडथळ्यांमुळे या महामार्गावर अपघातात अनेक बळी गेले, तर काही जण गंभीर जखमी झाले. कात्रज-कोंढवा मंतरवाडीमार्गे सासवडला जाणार्‍या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. या मार्गावरील अडथळे वाहतूक कोंडीस कारणीभूत असून, त्याची दखल घेतली जात नाही.

महामार्गावर उंड्री- हांडेवाडी भागात एका ठिकाणी एका वीज खांब्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, एकच वाहन जाईल अशी स्थिती आहे. प्रशासनाला हे माहीत असतानादेखील आजपर्यंत तो खांब काढण्यात आलेला नाही. यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

तीव्र चढ आणि तीव्र उताराच्या रस्त्यावर असलेला हा विजेचा खांब आहे. यामुळे कोंडीबरोबरच छोटे-मोठे अपघातही दररोज होतात. या रस्त्याची दखल प्रशासनाने घ्यावी, याकरिता भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या (निमंत्रित), बेटी बचाओ बेटी पढाओ प्रदेश प्रभारी डॉ. तेजस्विनी गोळे यांनी प्रशासनाला पत्र दिले आहे.

त्वरित कात्रज कोंढवा मंतरवाडी या मार्गाची पाहणी प्रशासनाने करावी व उपाययोजना आखावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.पिसोळी-उंड्री या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे स्थानिक नागरिक व्यावसायिक व वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सतत प्रदूषण या परिसरात होत असून, धुळीमुळे अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. हॉटेल व्यावसायिकांनी बनविलेल्या पदार्थांवर धूळ बसत आहे. प्रशासनाने त्वरित याची दखल घ्यावी, असेही पत्रामध्ये डॉक्टर गोळे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment