मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा; “छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर”

Photo of author

By Sandhya

जरांगे पाटील

मराठा आरक्षणावरून मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भूजबळ यांच्याबाबत हे मोठे विधान केले होते. नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

“छगन भुजबळ यांना भाजपकडून काही ऑफर आली असेल. गृहमंत्री काहीच बोलत नाही आणि त्यांना थांबवत देखील नाही. त्यामुळे मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारण्याचे ठरलं आहे का?, याबाबत आम्हाला शंका येत आहे. भुजबळ यांच्यावर देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नसल्याने आम्ही शंका का घ्यावी नाही.

भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची तर नाही ना?, कारण त्यांना पलटी मारण्याची सवय आहे. आतापर्यंत त्यांनी दहा ते पंधरा पलट्या मारल्या आहे. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी सरकारने भुजबळांना फूस लावली नाही ना?,” असे जरांगे म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मराठा आरक्षणासाठीचे लागलेले होर्डिंग फाडण्यात आले आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे. होर्डिंग फाडल्याने काही होणार नाही.

मात्र, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोण बिघडवत आहे याकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघितले पाहिजे. फडणवीस यांच्या मनात काय आहे?, हे एकदा त्यांनी सांगायला पाहिजे.

अंबडमध्ये ओबीसी सभा झाली, मात्र आम्ही एकही कुणाचं बॅनर फाडले नाही. होर्डिंग फाडल्याने आरक्षण घेण्यापासून लोकांना रोखता येणार आहे का?, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले पाहिजे. फडणवीस यांनी त्यांना थांबवला पाहिजे. होर्डिंग फाडणाऱ्यांना बहुतेक सरकारनेच पाठबळ दिले असेल,” असेही जरांगे म्हणाले.

Leave a Comment