‘‘ससून रुग्णालय हे आरोग्य सेवा देणारे रुग्णालय आहे की गुन्हेगारांचा अड्डा, असा प्रश्न पडला आहे. रुग्णसेवेच्या नावाखाली रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. याला जबाबदार कोण?
गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले गुन्हेगार रुग्णालयात मजा मारत असून येथून आपले धंदे चालवत आहेत. हे सर्व करण्याची हिंमत राजकीय राजाश्रयाशिवाय शक्य नाही.
त्यामुळे सरकारने या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) त्वरित चौकशी करावी,’’ अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पुणे दौऱ्यावर आलेले असताना वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ससून रुग्णालयातील गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.
राजकारणाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून या राज्यांमध्ये काँग्रेस भक्कम आहे. तर काही राज्यांमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी थेट लढाई आहे. त्यात आताच्या सर्वेक्षणानुसार पाचही राज्यात काँग्रेस बहुमताने येईल.’’
खासगीकरणाला विरोध…‘‘कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात यापूर्वी विरोधी पक्ष म्हणून आवाज उठविला आहे. हा निर्णय आरक्षण आणि गुणवत्तेच्या मुळावर उठणारा आहे.
कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय रद्द करावा, ही मागणी लावून धरली आहे. शाळांचे खासगीकरण आणि महाबळेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयाचे खासगीकरणाला विरोध आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
‘भाजपला दिसतोय पराभव’‘‘चंद्रपूर असो किंवा पुणे येथील पोटनिवडणूक होत नाही, कारण या दोन्ही ठिकाणी भाजपला सपशेल पराभव दिसत होता.
भाजपने केलेल्या चार वेगवेगळ्या सर्वेक्षणातून त्यांचा पराभव निश्चित होता. त्यामुळे दोन्ही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा दावा वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्रिपद, पालकमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद कोणाला द्यायचे, एक ‘दादा’ दुसऱ्या ‘दादा’वर वरचढ ठरतोय, हे सध्याचे राज्याचे राजकारण आहे. हे राजकारण राज्याचा सत्यानाश करण्यासाठी सुरू आहे.
आताच्या काळात प्रचंड निविदा काढल्या जात आहेत. त्यातून सरकारी तिजोरीची प्रचंड लूट सुरू असून वस्तादांची टोळी राजरोजसपणे सरकारी तिजोरीची लूट करत आहे.- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते