नाना पटोले : काँग्रेस सत्तेत यावी ही जनतेची इच्छा

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्यांच्या सोबत असून, हाच पक्ष सत्तेत असावा, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस सत्तेत येण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी आढावा बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, आ. कुणाल पाटील, आ. हिरामण खोसकर, उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रणिती शिंदे, जिल्हा प्रभारी राजू वाघमारे, माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार ढिकले, शहराध्यक्ष आकाश छाजेड, राजाराम पानगव्हाणे, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, धनंजय कोठुळे, राजेंद्र बागूल यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यभरात गेल्या महिन्यापासून संघटनात्मक आढावा बैठकांसाठी दौरे सुरू करण्यात आले आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा-विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळेल, त्यासाठी भक्कम पायाबांधणी करणे आवश्यक असणार आहे.

देशपातळीवर काही धोरणात्मक निर्णय झाले आहे; मात्र आता त्याची अंमलबजावणी पक्षाच्या सर्वच स्तरावरून काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. त्यासाठीच आढावा बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.

टोलमुक्तीसाठी आंदोलन करणार २०१४ पासून भाजपने देशाला फक्त स्वप्न दाखवले आहेत. त्यामध्ये टोलमुक्त रस्ते हेदेखील एक स्वप्नच होते. त्याविरोधात आता काँग्रेस आंदोलन करणार आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून अद्याप जागावाटप वगैरे यावर कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही, निवडणुकीपूर्वी काँग्रेस संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेईल आणि त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

अधिवेशनात होणार पर्दाफाश नाशिकमध्ये १४० किलो ड्रग्ज सापडले आहेत. यामुळे पोलिस आणि गृहखात्याच्या कामगिरीवर संशय निर्माण होत आहे. काही आमदार, मंत्री या ड्रग्ज रॅकेटला पाठिंबा देत आहेत. त्यांची नावे आणि कारनामे आमच्याकडे आलेले आहेत. येत्या अधिवेशनात त्या सर्वांचा पर्दाफाश करण्यात येईल, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास राष्ट्रवादी पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर साक्ष होऊन लवकरच चिन्ह आणि नाव याबाबत स्पष्टता येईल. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. नक्कीच महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागेल, यात शंका नाही, असे पटोले यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एकमेव आमदाराकडे दुर्लक्ष  व्यासपीठावर मध्यभागी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे आदी प्रदेश पातळीवरील नेते होते.

त्यानंतर जिल्हा पातळीवरील राजू वाघमारे, राहुल दिवे, राजेंद्र बागूल आदी नेते आणि पहिल्या रांगेत अगदी टोकाला जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले हिरामण खोसकर बसलेले होते. त्यांना संपूर्ण जिल्हा काँग्रेसने एका बाजूला केले की काय, असाच प्रश्न यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चिला गेला.

Leave a Comment