केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी आहे. या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास १० वर्षांची शिक्षा तसेच ७ लाखांचा दंड भरावा लागणार आहे.
या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप आहे. वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, जनविरोधी काळे कायदे पारित करून जनतेस वेठीस धरण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.
आधीच्या कायद्यानुसार अपघात झाल्यास एक दोन वर्षाची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड होता. पण नवीन कायद्यानुसार अपघात झाल्यास वाहन चालकास १० वर्षांची शिक्षा तसेच ७ लाखांचा दंड भरावा लागणार आहे.
त्यामुळे या काळ्या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप आहे. वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा केंद्र सरकारने रद्द करावा, अशी मागणी करत ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.