मुंबई महानगर पालिकेतील सनदी अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. निवडणूक आयोगाने सांगून देखील या अधिकाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत. मुख्यमंत्र्यांवर या अधिकाऱ्यांनी दबाव आणला आहे का? मुख्यमंत्र्यांचा कोणी हात धरला आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
त्यामुळे सरकारने या अधिकाऱ्यांच्या वेळीच बदल्या केल्या पाहिजेत. तरच मुंबईतील निवडणुका फ्री अँण्ड फेअर वातावरणात पार पडतील, असा जोरदार हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे.
सरकार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करत नसल्याने आता आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाल पत्र पाठविले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईतील साकीनाका येथे क्रांती नगर, बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकांसाठी सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले. यामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप होत असताना हा घोटाळा होतो.
यामध्ये मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे का? असा सवाल करत या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबईतील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नसीम खान उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ईक्बाल सिंह चहल यांची बदली होत नाही. त्याचबरोबर अश्विनी भिडे, वेलारासू हे वरिष्ठ सनदी अधिकारी देखील त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे हे आएएएस नसताना देखील मोठ्या पदावर आहेत.
हे अधिकारी मर्जीतील असल्याने ते पक्षपातीपणा करू शकतात. हे अधिकारी निधी वाटपात दुजाभाव करू शकतात. निवडणुकीदरम्यान प्रभाव पाडून शकतात. या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त केले पाहिजे. मुंबई महापालिका आता भ्रष्टाचाराचा अड्डा झाली आहे. मुंबई साफ करण्याचं काम काही अधिकारी करत आहेत.
सरकारने याला वेळीच आळा घातला पाहिजे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकारने पाठीशी घालू नये, असे खडे बोल देखील वडेट्टीवार यांनी सुनावले आहेत. वडेट्टीवार म्हणाले की, साकीनाका येथे क्रांती नगर, बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले. या चावी वाटपात मोठा घोटाळा झाला आहे. हे चावी वाटप करताना बोगस नावे घुसविण्यात आली आहेत.
त्यानंतर लगेच या सदनिकांची खरेदी केली गेली. यातील काही लोक युपी मधील आहेत. ही शासनाची फसवणूक आहे. या प्रकरणात १० कोटी ५३ सदनिका संदर्भात बनावट कागदपत्रे बनवली गेली आहेत. हे हिमनगाचे टोक असून शेकडो कोटींचा यामध्ये घोटाळा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआटीमार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ्याला कोणाचा आशिर्वाद आहे हे समोर आले पाहिजे.
अधिकारी आणि लोकप्रतिनीधींनी संगनमताने केलेला हा घोटाळा असल्याची खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली आहे. काँग्रेसचे नसीम खान यांनी देखील या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.