शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी संपल्यावर आता राजकीय वर्तुळात यासंदर्भात निकालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात नेतृत्वाबदल होणार असल्याचा दावा केला आहे.
वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, १० तारखेच्या निकालानंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या बोहल्यावर बसेल. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक जण बाशिंग बांधून बसलेले आहेत.
अनेकांनी कपडे शिवून ठेवले आहेत, असेही ते म्हणाले. आम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहोत. जागावाटपासाठी उद्या दिल्लीत महाराष्ट्र राज्याविषयी बैठक आहे.
आमच्या पक्षाच्या सर्व्हेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही ३० पेक्षा अधिक जागा जिंकू शकतो, असे अंदाज आले आहेत. विदर्भातून काँग्रेसला साथ मिळेल व विदर्भातून आम्ही दहा पैकी सात जागा जिंकू, असा विश्वास वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.