अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचेच असेल तर शरद पवारांना सोबत घ्यावेच लागेल, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात भाजपने घातली असेल, असा गौप्यस्फोट विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दोन पक्ष फुटल्यानंतरही भाजपची परिस्थिती सुधारली नाही, यातूनच अजितदादा यांच्या वारंवार पवार यांच्याशी भेटीगाठी होत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील त्यांच्याकडे असलेल्या महितीवरच काही विधान केले असावे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे आहेत. त्यामुळे या भेटीला संभ्रम म्हणण्याचे काहीच कारण नाही. मी याला संभ्रम म्हणणार नाही.
शरद पवार त्यांची भूमिका पुन्हा एकदा नक्कीच स्पष्ट करतील. काही काळ धीर धरला पाहिजे. मविआविरोधात ते भूमिका घेतील असे वाटत नाही. यापूर्वीही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मविआ सोबत असल्यास एक आणि नसल्यास आमची दुसरी भूमिका तयार असणे यात गैर नाही.
निवडणूक लढायची म्हटल्यावर सारे पक्ष सज्ज असतात. भाजप, काँग्रेस, शिवसेना ४८ मतदारसंघात चाचपणी सुरूच आहे. शिंदे गट किंवा अजितदादा गटानेही ती केली आहे. मुळात या दोघांच्या गुप्त भेटीत कुणाची तरी गरज आहे.
निश्चितच ही गरज जो भेटायला जातो त्याचीच आहे, याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. दुसरीकडे शरद पवार सोबत न आल्यास अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्नच बघत राहावे लागेल, असे भाजपने कदाचित म्हटले असेल.
शेवटी हा सत्तेसाठी सुरु असलेला खटाटोप आहे. येथे विचारांना तिलांजली देण्यात आली आहे, विकासाला तिलांजली दिली आहे. केवळ खुर्चीला महत्त्व दिल्याचे या घडामोडींमधून दिसत आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.