विजय वडेट्टीवार : खोटारड्या सरकारला तडीपार करणार; इंडिया आघाडीच्या ३८ जागा येणार, देशातील सत्ता बदलणार…

Photo of author

By Sandhya

विजय वडेट्टीवार

अलीकडच्या काळात पुणे शहराची ओळख ही ड्रग्ज माफियांचे शहर, क्राइमचे शहर अशी झाली आहे. ही ओळख पुसणे गरजेचे आहे, त्यासाठी या खोटारड्या सरकारला तडीपार करायचे आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीच्या ४८ पैकी ३८ जागा येतील आणि देशातील सत्ता बदलेल, मोदी सत्तेला लगाम लागेल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

शहरातील काँग्रेस भवन येथे आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, काँग्रेस महाराष्ट्रचे सहप्रभारी आशिष दुवा, गुजरात काँग्रेस प्रवक्त्या प्रगती अहिर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माेहन जाेशी, आबा बागूल, प्रकाश सोनवणे आदी उपस्थित हाेते.

वडेट्टीवार म्हणाले, विदर्भ व मराठवाड्यात निवडणुका झाल्या. यामध्ये लोकांचा काँग्रेसला उत्तम प्रतिसाद दिसताे आहे. आमच्या सभांना प्रतिसाद मिळताे आहे. दुसरीकडे देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याप्रमाणे सभा घेतात.

पण, त्यांना प्रतिसाद नाही. मोदींची जादू किती प्रयत्न केला तरी चालत नाही. माेदींनी विकासावर बोलायला हवे मात्र बोलत नाहीत. यावेळी ते राम मंदिराच्या नावावर मते मागत आहेत. तसेच हिंदू-मुस्लीम, भारत-पाकितस्तान हे मुद्देही आणले जात आहेत.

पुण्यात रिक्षाचालक, दुकानदार, झोपडपट्टी ते सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा, सामान्याचे दुःख समाजणारा काँग्रेसचा उमेदवार रवींद्र धंगेकर हे १ लाख मताधिक्याने निवडून येतील, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उज्ज्वल निकम खाेटे बाेलले २६-११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीमध्ये उज्ज्वल निकम सांगतात की, कसाबला बिर्याणी दिली. परंतु, तत्कालीन महासंचालकांनी हे काेठेही नमूद केलेले नाही. उज्ज्वल निकम यांना त्यावेळी हे खोटे बोलायला लाज वाटली नाही का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, पाेलिस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गाेळी ही कसाबची नव्हती असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांचे हात दगडाखाली राज यांची भूमिका ही सातत्याने बदलत आहे. आता ते भाजपचा प्रचार करत आहेत. लाव रे ताे व्हिडीओ असे म्हणणारे ठाकरे या जुमलेबाजांना सहजासहजी जुमानणारे नसून नक्कीच त्यांचे हात दगडाखाली असतील म्हणून त्यांनी भाजपचा आधार घेतला असेही ते म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page