पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी आज अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी आज अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवाल यांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे सत्र न्यायालयने आज या चार जणांना कोठडी सुनावली आहे. १९ तारखेला पुण्यातील कल्याणीनगर भागात भीषण अपघात झाला होता. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला होता.
कोर्टात काय झाला युक्तीवाद? विशाल अग्रवाल यांना चौकशीसाठी पुणे पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती. मात्र, न्यायालयाने ती अमान्य करत विशाल अग्रवालसह अन्य तीन आरोपींना 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला कार चालवायला दिली तसेच तो दारू पितो हे माहिती असतानाही त्याला पार्टीला जाण्यास परवानगी दिली. या कारणांमुळे विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमाच्या 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलाला रेस्टॉरंटमध्ये मद्य देणाऱ्या रेस्टॉरंटसह त्याच्या वडिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना वकिल असीम सरोदे म्हणाले, विशाल अग्रवाल यांनी मुलाकडे लक्ष दिलं नाही. गाडीचे रजिस्ट्रेशन केलेले नव्हते. गाडीवरती नंबर टाकण्यात आलेला नव्हता. आपल्या मुलाकडे परवाना नाही हे माहिती असतानाही त्यांनी मुलाला गाडी चालवायला दिली.
मुलाचं वय १८ वर्ष नसताना त्याला बार, पबमध्ये जाऊ देणं, हे देखील चांगल्या पालकांचं लक्षण नाही. त्यामुळे ज्युवीनाईल जस्टीस अॅक्टनुसार त्यांनी आपल्या मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे हा अपघात घडलेला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या वडिलांना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.