वडिलांनी रागवल्याच्या कारणातून तेरा वर्षांच्या मुलाने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले

Photo of author

By Sandhya

तेरा वर्षांच्या मुलाने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले

जनावरांना पाणी पाज, असे वारंवार सांगूनही ऐकले नसल्याने वडिलांनी रागवल्याच्या कारणातून चिमगाव (ता. कागल) येथील समर्थ बाजीराव तिळवे या तेरा वर्षांच्या मुलाने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले. हा प्रकार बुधवारी (दि. 23) सकाळी दहाच्या सुमारास घडला.

कीटकनाशक प्राशन केल्यानंतर समर्थला उलट्या होऊ लागल्या. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ सीपीआरमध्ये उपचारांसाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने तिळवे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

चिमगाव येथील बाजीराव तिळवे हे शेतकरी आहेत. शेती आणि जनावरे सांभाळून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आठवीच्या वर्गात शिकणारा मुलगा समर्थ याला त्यांनी बुधवारी सकाळी जनावरांना पाणी पाजायला सांगितले.

वारंवार सांगूनही काम ऐकत नसल्याने वडील समर्थवर रागावले. याच रागातून समर्थ याने घरातच कीटकनाशक प्राशन केले. त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर हा प्रकार वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने त्याला उपचारांसाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या मागे आई, वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे.  

Leave a Comment