पुणे : हडपसरमधील शेतकरी तसेच हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या अपहरण व खूनप्रकरणाला वेगळे वळण लागले असून, या खूनप्रकरणात त्यांच्या पत्नीचाच सहभाग असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. पत्नीनेच सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांच्या पत्नीला देखील बुधवारी अटक करण्यात आली आहे.
मोहिनी सतीश वाघ (४५) असे सतीश वाघ यांच्या पत्नीचे नाव आहे. सतीश वाघ (वय ५९) यांचे नऊ डिसेंबरला पहाटे अपहरण करून त्यांचा उरुळी कांचन भागातील शिंदेवणे घाटात खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. फ्लॅट नंबर २०१ लक्ष्मी हाईट्स, काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. अनुसया पार्क, गणेश नगर, डोमखेल रोड, वाघोली, मुळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८, रा. बजरंग नगर, बाजार तळ्याशेजारी, आव्हाळवाडी रोड, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर), अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय २९, रा. फ्लॅट नंबर ३०५ विघ्नहर्ता सोसायटी, शामचंद्र पार्क, फुरसुंगी फाटा) आणि अतिश संतोश जाधव (वय २०, लोणीकंद, मुळ रा. धाराशिव) यांना अटक केली आहे.
या खून प्रकरणात प्रथम वाघ यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या अक्षय जावळकर याने पाच लाख रुपयांची सुपारी देऊन वाघ यांचा खून केल्याची केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता तपासात सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी वाघ यांच्याच पत्नीने दिल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने पत्नीला अटक केली असून, तपास सुरू केला आहे. मोहिनी हिने पतीच्या खुनाची सुपारी का दिली? ही सुपारी कोणाच्या माध्यमातून देण्यात आली? गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? जावळकर याने इतर आरोपींना दिलेले पाच लाख रुपये कुठून आले याचा पोलिस तपास करत आहेत.
अतिश जाधवला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
वाघ अपहरण व खून प्रकरणात अटक आरोपी अतिश संतोष जाधव याला लष्कर न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सतीश वाघ यांचा खून केल्यानंतर पसार झालेल्या आरोपी अतिशला धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इंदिरानगर येथून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपी अतिशविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपी अतिश जाधव याने साथीदार पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे या तिघांसोबत मिळून हा गुन्हा केला असून, त्यासाठी आरोपी अक्षय जावळकर याने सुपारी दिल्याची कबुली चौकशीत दिली, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. जाधव याची यापूर्वी अटकेत असलेल्या साथीदारांसोबत एकत्रित चौकशी करायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील डॉ. आम्रपाली कस्तुरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.