येत्या 24 तासांत महाराष्ट्रातील ‘या’ भागांत विजा; शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपेना

Photo of author

By Sandhya

मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पण आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळीचे ढग आले असून काही भागात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये वादळाची स्थिती निर्माण झालेली असल्याने महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यामध्ये पावसासाठी पोषक असे हवामान तयार झालेले आहे. त्यामुळे राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह अन्य भागात येत्या 24 तासांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.

छत्तीसगडपासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

पश्‍चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर, तसेच उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. मागच्या 24 तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

तर सोलापूर, परभणी, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा, वाशीम येथे 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 35 ते 39 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमान कमी-अधिक होत आहे. पारा 14 ते 25 अंशांच्या दरम्यान होता.

Leave a Comment