सासवड नगरपरिषदेच्या ‘संपर्क कनेक्ट’ ॲपचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अनावरण

Photo of author

By Sandhya

नागरिकांच्या तक्रारी, समस्या आणि विविध नागरी सेवांबाबतचा संवाद अधिक परिणामकारक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने सासवड नगरपरिषदेकडून विकसित करण्यात आलेल्या ‘संपर्क कनेक्ट’ या मोबाईल ॲपचे अनावरण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून नागरिकांना प्रशासनाशी थेट संपर्क साधण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.
डिजिटल युगात नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच तक्रारींचा निपटारा जलद आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा या उद्देशाने हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, सार्वजनिक सुविधा यांसह विविध नागरी समस्यांबाबत तक्रारी नोंदविता येणार आहेत. तसेच तक्रारींच्या निवारणाची स्थितीही नागरिकांना ऑनलाइन पाहता येणार असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीत अधिक पारदर्शकता येणार आहे.
या प्रसंगी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सासवड नगरपरिषदेच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. “तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिक चांगल्या आणि सुलभ सेवा देण्याचा सासवड नगरपरिषदेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करून सुशासनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार संजय जगताप, सासवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण, नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, राजन जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, प्रदीप राऊत, नगरसेविका स्मिता उमेश जगताप, स्मिता सुहास जगताप, लिना वढणे, अर्चना जगताप, प्रियांका जगताप, शितल भोंडे
तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘संपर्क कनेक्ट’ ॲपमुळे नागरिकांना त्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध होणार असून तक्रारींच्या निवारण प्रक्रियेत वेग, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे. सासवड शहरातील नागरी सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि स्मार्ट प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हे ॲप महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
सासवड नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा घेतलेला हा पुढाकार भविष्यात इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी माजी आमदार संजय जगताप यांना व्यक्त केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page