
चाकण : वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचा जातोय नाहकबळी!,.
गतवर्षात एकोणीस वाहनांच्या धडकेत सतरा जणांचा मृत्यू,.
वाहनचालकांच्या बेफिकिर व निष्काळजीपणामुळे सुपातील जात्यात येऊन भरडल्या जात असलेल्या निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जाऊ लागला आहे. सन – २०२४ मध्ये एकोणीस अज्ञात वाहनांच्या धडकेत सतरा जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे, तळवडे रस्त्यावर अवजड ट्रेलरला कारची जबरदस्त धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सुरेश गिरणार या पोलीस अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका तरुण कार्यक्षम अधिकाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे या भागातील नागरिकांनी प्रचंड हळहळ व्यक्त केली. अवजड वाहन चालकांचा बेफिकीरपणा अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याची बाब समोर आली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत, तसेच चाकण – तळेगाव, चाकण – शिक्रापूर मार्ग, पुणे – नाशिक महामार्गावर अवजड वाहन चालकांच्या निष्काळजीपणाने सातत्याने विचित्र अपघात होत आहेत. ही अवजड वाहने बेफिकिरीने चालवणारे चालक अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची मोठ्या प्रमाणात अवजड वाहने रस्त्याने ये – जा करतात. अवजड वाहनाने धडक दिल्याने अनेक अपघात सहजपणे होत आहेत. त्यात अनेकांचे जीव जातात, तर काहीजण कायमचे जायबंदी होतात. अनेक जण नशेत असतात. त्यांची बाजू सोडून ते दुसऱ्या बाजूला विरुद्ध बाजूस असलेल्या मार्गीकेत येतात. त्यामुळे येणारी व जाणारी वाहने त्यांना धडकतात. त्यातून भीषण अपघात होतात. जितेंद्र गिरनार या पोलीस अधिका-याचा अपघातही ट्रेलर त्याची बाजू सोडून विरुद्ध बाजूला आल्यामुळे झाला आहे.
- मोजकी वाहने सापडतात – ” चाकण भागातील महामार्गावर वर्षभरात ५० अपघात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेले आहेत. पोलीस दप्तरी मात्र अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू तसेच जखमी अशी नोंद होते. काही वाहने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सापडतात तर काही वाहने सापडत नाहीत,” असे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे यांनी सांगितले.
” अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा येणे अत्यंत गरजेचे आहे. हे वाहन चालक नशेत असतात. त्यामुळे अपघात होतात आणि फरार होतात. चाकण महामार्गावर बऱ्याच वेळा अशा अवजड वाहनांच्या धडकेने अपघात होत आहेत. अवजड वाहनाच्या वेगावर तसेच चालकांच्या नशेबाबत वाहतूक पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे.” – विशाल नायकवाडी, नगरसेवक, चाकण.
- अपघातानंतर वाहन चालक वाहनांसह पळून जातात. त्यांचा शोध लागत नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले तरी त्यांचा ठावठिकाणा मिळत नाही. अपघात झाल्यानंतर कोणी त्या वाहना बाबत माहिती देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू व अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी अशीच नोंद पोलीस दप्तरी होते. सन २०२३ मध्ये १९ वाहनाच्या धडकेत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सन २०२४ मध्ये १७ अज्ञात वाहनाच्या धडकेत १७ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या वाहनांचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलीस दप्तरी अज्ञात वाहनाने धडक अशीच त्यांची नोंद आहे.” – प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे.