Headlines

येरवडा पोलिसांची धडक कारवाई; चोरीच्या विदेशी दारूसह दोघांना अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची कामगिरी; २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे, चोरीच्या घटना आणि अन्य बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी येरवडा पोलिसांनी विशेष गस्त आणि तपास मोहीम राबवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत चोरीच्या विदेशी दारूच्या सहा बाटल्यांसह दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईत तब्बल २७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांनी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला सतर्क राहून संशयित व्यक्ती, वाहनचोरी तसेच अवैध वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक येरवडा परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार संदिप जायभाय यांना जी.एस.टी. कार्यालयाजवळ काही इसम संशयास्पदरीत्या थांबले असून, त्यांच्याकडे चोरीचे साहित्य असण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

ही माहिती त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांना दिली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गिते यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार तपास पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा केली असता सह्याद्री रुग्णालयाकडून जी.एस.टी. कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत दोन इसम संशयास्पदरीत्या थांबलेले आढळून आले.

पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी तेथे थांबण्याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्या ताब्यातील बॅगेची तपासणी करण्यात आली. बॅगेमध्ये विदेशी दारूच्या सहा बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे दारूच्या बाटल्यांबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही.

पोलिसांनी दोघांना येरवडा पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली. त्यावेळी त्यांनी सदर विदेशी दारूच्या बाटल्या कल्याणीनगर येथील टॉनिक आऊटलेटमधून चोरी केल्याची कबुली दिली. तपासात सदर दारूचा मुद्देमाल येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये दाखल गुन्ह्यातील चोरीचा माल असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलिसांनी रोहन राम कांबळे (वय २८, रा. बी विंग, फ्लॅट क्रमांक १०७, प्रिस्टीन सिटी, बकोरी गाव, ता. हवेली, जि. पुणे) आणि अमित महादेव सितापुरे (वय २७, रा. सिद्धार्थनगर, मच्छी मार्केट, येरवडा गाव, पुणे) यांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या सहा विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण २७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे येरवडा परिसरातील चोरीच्या घटनांवर तसेच अवैध वस्तूंच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, गोपनीय माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांनी तातडीने कारवाईचे आदेश देत तपास पथकाला सक्रिय केले. त्यामुळे संशयित इसमांना वेळीच ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा अतिरिक्त कार्यभार पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४ पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार मुकुंद कोकणे, पोलीस अंमलदार बालाजी सोगे, संदिप जायभाय, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, शैलेश वाबळे, नटराज सुतार आणि सोमनाथ गायकवाड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सातत्याने गस्त, गोपनीय माहितीचे संकलन आणि संशयितांवर तत्काळ कारवाई करण्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या नेतृत्वाखाली येरवडा पोलिसांकडून भर दिला जात असून, या कारवाईमुळे परिसरातील अवैध हालचालींना चाप बसण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *