Headlines

नवीन समाविष्ट गावांतील रस्ते व ड्रेनेज दुरुस्ती कामांना गती देण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या सूचना

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आणि मूलभूत नागरी सुविधांच्या समस्यांची गंभीर दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी संबंधित विभागांना रस्ते व ड्रेनेजची कामे तातडीने हाती घेऊन त्यांना गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नवीन समाविष्ट गावांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असून काही ठिकाणी रस्ते अपूर्ण आहेत. तसेच ड्रेनेजची अपुरी व्यवस्था, पावसाळ्यात रस्त्यांवर साचणारे पाणी, चिखल आणि वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच दैनंदिन वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनत आहे.

या पार्श्वभूमीवर म्हाळुंगे गावासह सर्व नवीन समाविष्ट गावांतील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच ड्रेनेज व्यवस्थेची स्थळनिहाय पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशा स्पष्ट सूचना महापौर मंजुषाताई नागपुरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

“नवीन समाविष्ट गावांतील नागरिकांनाही पुणे शहरातील इतर भागांप्रमाणे दर्जेदार मूलभूत नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रस्ते आणि ड्रेनेजसारख्या अत्यावश्यक सुविधांच्या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून कामांना गती द्यावी,” असे महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी सांगितले.

तसेच संबंधित विभागांनी प्रत्येक नवीन समाविष्ट गावातील रस्ते व ड्रेनेजच्या समस्यांचे स्थळनिहाय सर्वेक्षण करून कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, आवश्यक निधी व मनुष्यबळाचे नियोजन करावे आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे, असेही महापौरांनी निर्देशित केले आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करताना केवळ तात्पुरती डागडुजी न करता दर्जेदार व टिकाऊ कामे करण्यात यावीत, तसेच ड्रेनेज व्यवस्थेतील अडथळे दूर करून पावसाचे पाणी साचणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

नवीन समाविष्ट गावांचा नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक विकास हा महापालिकेच्या प्राधान्यक्रमाचा भाग असून, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने आणि वेळबद्ध पद्धतीने काम करावे, अशी भूमिका महापौरांनी व्यक्त केली.

– महापौर कार्यालय,
पुणे महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *