Headlines

पाटस रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा जीव धोक्यात! अर्धवट पादचारी पूल पूर्ण न केल्यास ४ जानेवारीनंतर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा

अदानी सिमेंट कंपनीच्या वाढीव रेल्वे मार्गामुळे प्रवाशांची गैरसोय; रयत क्रांती संघटना व कानगाव ग्रामस्थ आक्रमक

दौंड तालुक्यातील पाटस रेल्वे स्थानकावर अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पुलामुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अदानी सिमेंट कंपनीच्या वाढीव रेल्वे लाईनमुळे रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूने प्रवाशांचा प्लॅटफॉर्मवर जाण्याचा संपर्क तुटला असून, तिकीट काढण्यासाठी तसेच रेल्वेतून उतरून बाहेर येण्यासाठी प्रवाशांना तब्बल चार रेल्वे लाईन ओलांडाव्या लागत असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या धोकादायक परिस्थितीमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, यापूर्वीही अनेक अपघात घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यातच रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेला दगडी खडीचा मोठ्या प्रमाणात साठा केला जात असल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडत आहे.

या गंभीर समस्येकडे रेल्वे प्रशासन आणि अदानी सिमेंट कंपनीने तातडीने लक्ष देण्याची मागणी रयत क्रांती संघटना व कानगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. पाटस रेल्वे स्थानकावरील अर्धवट अवस्थेत असलेला पादचारी पूल त्वरित पूर्ण करावा, तसेच प्लॅटफॉर्मसमोरील उत्तर दिशेला असलेला खडीचा साठा हटवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात मध्य रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक, पाटस रेल्वे स्टेशन मास्तर, अदानी सिमेंट कंपनी, दौंड तहसीलदार आणि दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून, जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार राहुल कुल यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

४ जानेवारी २०२७ नंतर अचानक रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा!

पादचारी पुलाचे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. तसेच रेल्वे मार्गालगत असलेला खडीचा साठा हटवून प्रवाशांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ४ जानेवारी २०२७ नंतर कोणत्याही क्षणी पाटस रेल्वे स्थानकावर अचानक रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे आणि दौंड तालुका अध्यक्ष सर्फराज शेख यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न असल्याने रेल्वे प्रशासन आणि अदानी सिमेंट कंपनीने आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच पादचारी पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी पाटस व कानगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.