Headlines

पाटस परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! यात्रा तोंडावर, यवत पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

चार दिवसांवर यात्रा येऊन ठेपली; अवैध धंद्यांना आळा घालण्याची नागरिकांची मागणी

दौंड तालुक्यातील पाटस परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, परिसरात हे धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यात यवत पोलिस प्रशासनाला यश येत नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांवर पाटस येथील यात्रा येऊन ठेपली आहे. यात्रेच्या निमित्ताने परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक, व्यापारी आणि नागरिकांची गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत अवैध धंद्यांवर वेळीच कारवाई न झाल्यास यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

यात्रा म्हटले की मोठी गर्दी, वाहतूक व्यवस्था, दुकाने आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली वर्दळ हे चित्र असते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत काही समाजकंटकांकडून गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यात्रेपूर्वीच पोलिस प्रशासनाने सतर्क होऊन अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

पाटस परिसरातील अवैध धंद्यांवर नेमकी कारवाई कधी होणार? यात्रेच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारींची पोलिस प्रशासन दखल घेणार का? असे सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

यवत पोलिस प्रशासनाने पाटस परिसरात विशेष गस्त वाढवावी, अवैध धंद्यांवर धडक कारवाई करावी, संशयित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि यात्रेच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

यात्रा आनंदात आणि शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीतून आपली जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षा पाटसकर नागरिक व्यक्त करीत आहेत.