Headlines

पाटस-वरवंड यात्रेच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करा! संभाजी ब्रिगेडची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

अवैध शस्त्रधारकांवर विशेष मोहीम राबवा; यात्रेपूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची अविनाश मोहिते यांची मागणी

दौंड तालुक्यातील पाटस व वरवंड येथे दि. २४ व २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पारंपरिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रेला महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविक, नागरिक व व्यापारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन सराईत गुन्हेगारांकडून चोरी, मारामारी, दहशत निर्माण करणे तसेच गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेता, पाटस-वरवंड परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना स्थानबद्ध करून त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडचे पुणे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. गिल यांची भेट घेऊन यासंदर्भात अधिकृत निवेदन सादर केले आहे. तसेच निवेदनाच्या प्रती यवत पोलीस स्टेशन व दौंड पोलीस स्टेशन यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

मागील यात्रेदरम्यान हत्यारबंद गुन्हेगारांचा मोठा गुन्हेगारी कट उघडकीस आला होता. पोलिसांनी पाठलाग करून संबंधितांकडून तीन ते चार पिस्तुले हस्तगत केली होती. ही घटना अत्यंत गंभीर असून आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने केवळ घटना घडल्यानंतर कारवाई न करता संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी आधीच प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका अविनाश मोहिते यांनी मांडली.

पाटस व वरवंड परिसरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींची सखोल चौकशी करावी. उपलब्ध पुरावे व कायदेशीर तरतुदींनुसार स्थानबद्धता, हद्दपारी आणि इतर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसेच अवैध पिस्तुले व शस्त्रांची तपासणी करण्यासाठी विशेष पोलीस मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख मागण्या

१. पाटस, वरवंड व परिसरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर कायदेशीर प्रक्रियेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करावी.

२. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करावी.

३. अवैध पिस्तुले व इतर शस्त्रांच्या शोधासाठी विशेष पोलीस मोहीम राबवावी.

४. यात्रेच्या दोन्ही दिवसांत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व साध्या वेशातील पोलीस पथके तैनात करावीत.

५. परिसरातील अवैध धंदे व समाजविघातक कृत्यांवर विशेष पथकाद्वारे धडक कारवाई करावी.

६. महिला, भाविक, व्यापारी व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात.

७. यात्रेपूर्वीच सुरक्षा व्यवस्थेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा.

यावेळी अविनाश मोहिते म्हणाले की, यात्रा हा भाविकांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव आहे. या उत्सवात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे महिला, लहान मुले, व्यापारी व सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होता कामा नये. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेड कोणतीही तडजोड करणार नाही. पोलीस प्रशासनाने निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन यात्रेपूर्वीच ठोस कारवाई करावी. अन्यथा पोलीस प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या निवेदनावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद जगताप, चंद्रशेखर गाडगे, सिद्धार्थ कोंढाळकर आदी पदाधिकाऱ्यांनीही या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.

आता आगामी पाटस-वरवंड यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन या मागण्यांची कितपत दखल घेते आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर कोणती ठोस पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.