Headlines

भरधाव चारचाकी थेट मारुती मंदिरात घुसली; मंदिराचे नुकसान

इंदापूर तालुक्यातील कळंब गावाजवळील नातेपुते चौकात अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही, गतिरोधक बसविण्याची मागणी

वालचंदनगर : बारामती-अकलूज रस्त्यावर इंदापूर तालुक्यातील कळंब गावाजवळ नातेपुतेकडे जाणाऱ्या चौकानजीक मंगळवार (दि. १७ नोव्हेंबर) रोजी रात्री सुमारे दहाच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मारुती मंदिरात घुसली. या अपघातात मंदिराचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहन भरधाव वेगाने जात असताना रस्त्यावरील नागरिकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या मारुती मंदिरात जाऊन धडकली. या धडकेत मंदिराचे नुकसान झाले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

कळंब गावाजवळील नातेपुतेकडे जाणाऱ्या चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघाताचा धोका कायम आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.