Headlines

सुपा पोलिसांची तत्परता अन् नागरिकांचे सहकार्य; ८० फूट खोल विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश!

भोंडवेवाडी (सुपा) – सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील भोंडवेवाडी गावच्या शिवारात लालासो देवकाते यांच्या शेतातील विहिरीमध्ये एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना दिनांक १७/११/२०२६ रोजी समोर आली.

नामदेव लकडे (वय ४५ वर्षे,रा.सुपा,ता.बारामती,जि.पुणे) असे मयत इसमाचे नाव आहे.

सदर घटनेची माहिती सुपा पोलीस स्टेशन येथे प्राप्त होताच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केली असता सुमारे ७० ते ८० फूट खोल विहिरीमध्ये पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.रात्रीची वेळ व अंधार असल्याने तसेच विहिरीची खोली अधिक असल्याने मृतदेह बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक होते.

अशा प्रतिकूल परिस्थितीत सुपा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी परिसरातील नागरिक व पोलीस पाटील यांच्या सहकार्याने क्रेनची व्यवस्था केली. क्रेनच्या सहाय्याने विहिरीमध्ये बाज सोडून पोलीस अधिकारी, अंमलदार व स्थानिक नागरिक यांच्या समन्वयातून अथक प्रयत्नांनंतर मृतदेह सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात यश आले.

त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज, बारामती येथे पाठविण्यात आला. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून नामदेव लकडे यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी खबर देणार गुलाब सोमा महानवर (वय ४१ वर्षे,रा.महानवरवस्ती,सुपा,ता.बारामती,जि.पुणे) यांनी दिलेल्या खबरीवरून सुपा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू क्रमांक ३५/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.सदर घटनेचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ताकवणे हे करीत आहेत.

पोलीस व जनता यांच्यातील समन्वयाचे उत्तम उदाहरण

सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याच्या आव्हानात्मक कार्यात सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार, भोंडवेवाडी व कुतवळवाडी गावांतील परिसरातील नागरिक तसेच पोलीस पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.त्यांच्या सहकार्यामुळे हे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करता आले.याबद्दल सुपा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व पोलीस अधिकारी,अंमलदार, पोलीस पाटील व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.