



अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची राजेंद्र पवारांकडून पाहणी
बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दिनांक 31 मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसासानाची पाहणी ॲग्रीकल्चरल डेव्ह्लपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र दादा पवार यांनी केली तसेच झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, होळ, सदोबाची वाडी, सस्तेवाडी इत्यादी गावांमध्ये केळी, डाळिंब, पेरू, वांगी, आंबा, कोथिंबीर, ऊस व चारा पिके यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्या संदर्भाने आज मा. श्री. राजेंद्र दादा पवार व केव्हीके बारामती चे तज्ञ यांनी सदर गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
वडगाव निंबाळकर येथील प्रगतिशील शेतकरी श्री. अभिषेक अनिल कुमार शहा यांची केळी,पेरूची बाग, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. त्याबाबत झालेल्या नुकसानाची माहिती श्री. शहा यांनी दिली.
सदोबाची वाडी येथील श्री. ऋषिकेश धुमाळ यांचे सव्वा एकर वरील अगोरा वांगी यांचे पूर्ण पाने, फुले, फळे गळून गेली होती. सदर प्लॉटची पाहणी करून ते पीक परत आणण्यासाठी तज्ञानंचे सल्ल्याने प्रयत्न करीत असल्याचे श्री. धुमाळ यांनी सांगितले.
सस्तेवाडी येथील श्री. नितीन कदम यांचे एक एकरावरील ढोबळी मिरचीचे शेडनेट गारा व जोराच्या वाऱ्याने संपूर्णपणे कोलमडले होते व पिकांचे नुकसान झाले होते. याच गावातील किशोर कदम यांची अर्ध्या एकर वरील काकडी आणि एक एकरवरील कोथिंबीर याचे देखील पूर्ण नुकसान झाले आहे. त्याबाबत त्यांनी माहिती घेऊन श्री. कदम यांचेशी चर्चा केली. तसेच श्री. कदम यांनी गारपीटीचे मोबाईल मधील फोटो दाखवले.
अश्या प्रकारच्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार रहावे. सरकार कडून काही प्रमाणात मदत मिळेल परंतु आपले नुकसान कमी करण्यासाठी शेतकर्यांनी देखील आपल्या पिकांचा विमा काढून घ्यावा. त्या प्रमाणे अश्या परिस्थितीत तग धरू शकतील अशी पिके करण्यावरती भर द्यावा असे आवाहन श्री. राजेंद्र दादा पवार यांनी केले.