छ.संभाजीनगरमधील प्रसिद्ध ‘उत्तम उपहार गृह’वर FDAचा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, तुकाराम मुंढेंचा आदेश अन् परवाना रद्द

Photo of author

By Sandhya

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिठाई उत्पादक आणि हॉटेल्सविरोधात राज्यभरात विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या गुलमंडी परिसरातील मच्छली खडक येथील अतिशय जुने आणि प्रसिद्ध नाश्ता केंद्र तसेच मिठाई उत्पादक दुकान ‘उत्तम उपहार गृह’वर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकली. या पाहणीदरम्यान ग्राहकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या तब्बल 10 गंभीर त्रुटी आढळून आल्या. यानंतर प्रशासनानं कडक पाऊल उचलत या आस्थापनेचा परवाना तातडीने निलंबित केला असून दुकान पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

तपासणीत उघड झालेला अस्वच्छता आणि भेसळीचा प्रकार

१. चुकीचा परवाना घेऊन उत्पादन: मिठाई, जिलेबी आणि इमरती तयार करण्यासाठी नियमानुसार ‘उत्पादक’ वर्गातील परवाना आवश्यक असताना, या आस्थापनेने केवळ ‘रेस्टॉरंट’ या चुकीच्या श्रेणीत परवाना मिळवला होता.

२. तळण्यासाठी अत्यंत विषारी तेलाचा वापर समोसे आणि भजी तळण्यासाठी वारंवार तेच तेल उकळले जात होते. या तेलाची चाचणी केली असता, त्याची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आढळली. आरोग्यासाठी अपायकारक असणारे हे तेल वापरून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू होता.

३. पुन्हा पुन्हा उकळलेले वनस्पती तूप: जिलेबी आणि इमरती तळण्यासाठी देखील निकृष्ट दर्जाचे आणि वारंवार वापरलेले वनस्पती तूप वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले.

४. खाद्यपदार्थांच्या जागी झुरळांचा वावर: जिथे खाद्यपदार्थ बनवले जातात, तिथेच मोठ्या प्रमाणावर झुरळ फिरताना दिसले. विशेष म्हणजे, येथे कीटकनाशक फवारणी केल्याची कोणतीही नोंद आढळली नाही.

५. रंगांचा बेकायदेशीर वापर: जिलेबी आणि इतर मिठाईत आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम रंगांचा बेकायदेशीर आणि अमर्याद वापर केला जात होता. हे रंग किती प्रमाणात वापरावेत, याचे कोणतेही भान कामगारांना नव्हते.

६. अस्वच्छतेचे साम्राज्य आणि काळपट भिंती: दुकानाच्या भिंतींवर जाळे आणि जळमटे साचलेली होती, तर समोसे तळणाऱ्या ठिकाणी भिंतींवर तेलाचे काळे थर जमा झाले होते.

७. कामगारांची वैद्यकीय तपासणी नाही: येथे काम करणाऱ्या २५ ते ३० कामगारांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती.

८. ड्रेनेजच्या शेजारी इडलीचे पीठ: सर्वात धक्कादायक म्हणजे, इडली तयार करण्यासाठी आंबवलेले पीठ चक्क उघड्यावर आणि सांडपाण्याच्या लाईनजवळ ठेवलेले आढळले.

९. तंबाखूच्या पिचकाऱ्या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी कामगारांचे तंबाखूचे पुडे आढळले, तर भिंतींवर तंबाखू खाऊन थुंकल्याचे विदारक चित्र समोर आले.

१०. उघडी कचराकुंडी: कचराकुंडीवर कसलेही झाकण नव्हते, तसेच खिडक्यांना जाळ्या नसल्याने माशा आणि इतर कीटकांचा थेट वावर होता.

संशयित तेलाचे नमुने प्रयोगशाळेत रवाना

या कारवाईनंतर पथकाने पेढीतून दूषित झालेले तेल आणि वनस्पती तुपाचे नमुने जप्त केले असून ते अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील इतर हॉटेल व्यावसायिक आणि मिठाई उत्पादकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page