Mumbai Marathi Journalists Association announces various awards for excellence in journalism

Photo of author

By Sandhya

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर
जयंत माईणकर, ज्ञानदा कदम, दिगंबर सावंत, संदीप पागडे,
रामकृष्ण खांदारे, राजेंद्र साळसकर पुरस्काराचे मानकरी

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कारांचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक व यूएनआय वृत्तसंस्थेचे महाराष्ट्रातील माजी ब्युरो चीफ जयंत माईणकर, एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, महाराष्ट्र टाइम्सचे माजी मुद्रितशोधक दिगंबर सावंत, दै. सामनाचे वृत्तछायाचित्रकार संदीप पागडे, दै. नवराष्ट्रचे रामकृष्ण खांदारे आणि पत्रकार राजेंद्र साळसकर यांना यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कारांचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे.
रोख रुपये दहा हजार, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असेल, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. सोमवार, दिनांक २२ जून, २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार्‍या पत्रकार संघाच्या ८४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या समारंभास द प्रिंटचे संपादक ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता हे महनीय प्रवक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथे संपन्न होईल.
यंदापासून पत्रकार संघाने बहुभाषिक ज्येष्ठ पत्रकार — साहित्यिक स्व. शरद वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, सर्वोत्कृष्ट निवेदक – सूत्रसंचालकासाठी (अँकर) पुरस्कार सुरू केला आहे. या पहिल्या पुरस्कारासाठी एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका ज्ञानदा कदम यांची निवड करण्यात आली आहे. या समारंभात वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेले पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य यांनाही पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्यत्व आणि सन्माननीय सहसदस्यत्व दिले जाणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार आज संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण यांनी जाहीर केले. पुरस्काराचे यंदाचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत.
शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार’ : रामकृष्ण खांदारे (दै. नवराष्ट्र)
वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रितशोधकास दिला जाणारा ‘कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर’ पुरस्कार : श्री. दिगंबर सावंत (महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त).
सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा ‘समतानंद अनंत हरि गद्रे’ पुरस्कार : श्री. राजेंद्र साळसकर
वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘अ‍ॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार’ पुरस्कार : श्री. संदीप पागडे (दै. सामना)
ज्येष्ठ पत्रकार/संपादकास दिला जाणारा ‘युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’ : श्री. जयंत माईणकर (राजकीय विश्लेषक आणि यूएनआय वृत्तसंस्था महाराष्ट्रचे माजी ब्युरो चीफ)

Leave a Comment

You cannot copy content of this page