Another arrest in the Kedgaon female foeticide case; investigation into the racket’s financial dealings underway.

Photo of author

By Sandhya

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणात आणखी एक अटक; रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांचा शोध सुरू

यवत -: पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) आणि यवत पोलिसांनी स्त्री-भ्रूणहत्या व बेकायदेशीर लिंगनिदान प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधाराची निकटवर्तीय मदतनीस असलेल्या सदिच्छा दिलीप शिंदे उर्फ सदिच्छा लक्ष्मण भोसले (वय 23) हिला अटक केली आहे. या प्रकरणात लिंगनिदानासाठी घेतले जाणारे पैसे तिच्या बँक खात्यावर जमा होत असल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याच्या संपर्कात होती. ती गरोदर महिलांना शिंदवणी येथील फार्महाऊस तसेच सिताई हाके नगर येथील फ्लॅटवर आणत होती. या ठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केले जात होते. त्यानंतर गर्भात मुलगी असल्याचे आढळल्यास संबंधित महिलांना केडगाव येथील रुग्णालयात गर्भपातासाठी पाठवले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्याचे सामाजिक आणि कायदेशीर गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय न्याय संहिता (BNS), PCPNDT कायदा आणि वैद्यकीय गर्भपात कायद्यातील विविध कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी बँक खात्यांची माहिती गोळा करून ती गोठविण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास अद्याप सुरू असून या रॅकेटमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

“महाराष्ट्र पोलीस आणि पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस प्रशासन या गुन्ह्याचा अत्यंत गंभीरपणे तसेच शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे तपास करत आहे. स्त्री-भ्रूणहत्या आणि बेकायदेशीर लिंगनिदान हा मानवतेला काळिमा फासणारा गंभीर गुन्हा आहे. या रॅकेटमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या, अथवा त्यांना पाठबळ देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, तो कितीही प्रभावशाली असला तरी, सोडले जाणार नाही. त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
संतोष तासगावकर
पोलीस निरीक्षक यवत

Leave a Comment

You cannot copy content of this page