

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावा
पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट होण्यासाठी समन्वयाने काम करा- मंत्री जयकुमार गोरे
आगामी आषाढी वारीमध्ये पालखीतील एकाही वारकऱ्याला असुविधा होता कामा नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत; त्यानुसार सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट पद्धतीने कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
आषाढीवारी निमित्त विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त शितल तेली- उगले, पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर जितेंद्र डूडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सोलापूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, अपर आयुक्त, सामान्य प्रशासन तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते.
आषाढीवारीदरम्यान पाणी, शौचालये, स्वच्छता, आरोग्य सुविधा, मुक्कामाची चांगली व्यवस्था आदींची चोख व्यवस्था ठेवावी असे सांगून मंत्री गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाने पालखी सोहळ्यासाठी पहिल्यांदाच गतवर्षीपासून निधीची तरतूद ठेवण्यास सुरूवात केली. यावर्षी पालखीसाठी ७६ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आवश्यकतेप्रमाणे सोयी सुविधा निर्माण करण्यात येत असून त्या दर्जेदार होतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
श्री. गोरे पुढे म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयांचा वापर होईल अशा ठिकाणी शौचालये ठेवावीत. तेथे पाण्याची उपलब्धता व सतत स्वच्छता होईल यासह शौचालयांच्या मार्गावर चिखल होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी त्या ठिकाणी काँक्रेटीकरण करण्याची कार्यवाही करावी. यावर्षी शौचालयांचे अतिरिक्त संच ठेवण्यात आल्याने किमान ३६ ते ४८ तास अगोदर ते पालखीच्या पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेल याची काळजी घ्यावी. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर, जलरोधक मंडप आदी व्यवस्था करण्यात आली आहे. असून वारकऱ्यांची निवाऱ्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालखीमार्गाला जोडणारे ग्रामीण भागातील रस्ते, मार्गापासून पालखीतळाकडे जाणारे रस्त्यांची तात्पुरती दुरूस्ती न करता कायमस्वरुपी टिकतील असे सिमेंटचे रस्ते करावेत. वारंवार रस्त्यांची दुरुस्ती करावी लागू नये यासाठी सिमेंट रस्ते करण्याबाबत प्रस्ताव पाठवावेत जेणेकरुन पुढील वर्षीच्या पालखीपूर्वी असे रस्ते तयार होतील, आदी सूचनाही श्री. गोरे यांनी यावेळी दिल्या.
गतवर्षी पालखीसोहळ्यात उत्कृष्ट काम केलेले मात्र आता बदली झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पालखी कालावधीदरम्यान उपलब्ध करून घ्याव्यात. आषाढी अगोदर व नंतर ८ दिवस व्हीआयपी दर्शन बंद करावे. सोलापूर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्या व दिंड्यांसाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेऊन नियोजन करावे, असेही श्री. गोरे म्हणाले.
यावेळी ग्रामविकासमंत्र्यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित असलेल्या पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडून तेथील सुविधांची व सुरू असलेल्या तयारीची माहिती घेतली. पंढरपूर येथील रस्त्यांचे कारपेट करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करून ८ दिवसांपूर्वीपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करावी. पालखीदरम्यान स्वच्छतेसाठी १ महिना अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात येत असून नगरपरिषदेच्या मनुष्यबळासह हे स्वच्छतेचे काम करणार आहे. स्वच्छतेबाबत काटेकोर दक्षता घ्यावी. भाविकांच्या मार्गदर्शनासाठी चांगल्या प्रकारचे दिशादर्शक फलक लावावेत. चंद्रभागा नदीत स्नान करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तेव्हढ्या बोटी ठेवाव्यात, अशा सूचना श्री. गोरे यांनी यावेळी दिल्या.
सचिव डॉ. पुलकुंडवार म्हणाले, दरवर्षी आषाढीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत असून यावर्षी ३० लाख विठ्ठलभक्त दर्शनासाठी येऊ शकतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने सर्व मनुष्यबळाने समन्वयाने काम करावे.
विभागीय आयुक्त श्रीमती तेली- उगले म्हणाल्या, पालखीच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाची, विसावे, पालखी मुक्कामाच्या ठिकाणांची पाहणी केली असून त्याबाबत आढावा घेतला आहे. पालखीच्या सुविधा व मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक त्या सुधारणा होत असल्याबाबत आढावा घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे विभागाच्यावतीने श्री. ठोंबर यांनी सादरीकरण केले. पालखी सोहळ्यादरम्यान पुणे जिल्ह्यात ३४३ ठिकाणी २८ हजार ५००, सातारा ८ हजार व सोलापूर जिल्ह्यात २११ ठिकाणी २९ हजार ५१० शौचलयांची उभारणी करण्यात येणार आहे. पुणे- २८, सातारा ७ व सोलापूर जिल्ह्यात २३ जर्मन हँगर, सर्व पालखी मार्गावर २२० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पालखीसाठी आरोग्य विभागाचे ५ हजार ६९८ इतके मनुष्यबळ कार्यरत असणार आहे. दिंडीप्रमुखांना एकूण १० हजार औषधांचे किट वाटप करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तिन्ही जिल्ह्यात २१ हजार ८२० इतके पोलीस अधिकारी, कर्मचारी मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. एकूण सर्व विभागांचे मिळून ५२ हजार ७०६ मनुष्यबळाची नेमणूक करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आषाढी वारीदरम्यान पंढरपूर येथे अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचे कनेक्शन जिओ नेटवर्कडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे मोबाइलद्वारे संपर्क व्यवस्था विस्कळीत होणार नाही, असे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले. दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, सातारा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनीही सादरीकरण करून माहिती दिली.
सोलापूर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जैन यांनी पालखीसोहळ्यासाठी तिन्ही जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची माहिती दिली. पंढरपूर येथे आषाढीवारीसाठी १० पालख्या येत असतात. या पालख्यांची ३८ मुक्कामाची ठिकाणे व ४३ विसावे असून ७ रिंगण होतात. पालखी सोहळ्यासाठी २३ जर्मन हँगर व ३७ जलरोधक मंडपांची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाणीपुरवठ्यासाठी २२० टँकर, ५०० स्नानगृहे, ५ हजार शौचालयांची व्यवस्था, १५ मोबाईल चार्जिंग व्हॅन, ४० ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत. मेडिसीन ऑन व्हील, बाईक ॲम्ब्युलन्स, हिरकणी कक्ष आदी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्यावतीने सादरीकरण केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य लोंढे (कबीरबुवा), विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे, श्री संत सोपानदेव देवस्थानचे मुख्य विश्वस्त त्रिगुण गोपाल गोसावी, श्री संत निळोबाराय संस्थानचे विश्वस्त अशोकराव सावंत (दूरदृष्यप्रणालीद्वारे) आदींनी यावेळी सूचना मांडल्या. त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री श्री. गोरे यांनी दिले.
दूरदृष्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आदी बैठकीस उपस्थित होते. विधानभवन येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख उमेश महाराज मोरे, यांच्यासह पाटबंधारे विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड मनपा, पोलीस विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग, भारतीय रेल्वे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, भारत संचार निगम लि., अन्न व औषध प्रशासन, महामेट्रो, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000