
लोकनेते स्व. मा. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने दि. २६/०७/२०२६ रोजी “आरोग्यवारी अल्ट्रा रन – २०२६” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेस पहाटे ०३.३० वा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे येथून प्रारंभ होणार असून वडकीनाला, दिवेघाट, सासवड, जेजुरी, मोरगाव, सुपा मार्गे स्पर्धा बारामती शहरात प्रवेश करणार आहे. बारामती शहरातील नटराज नाट्यकला मंदिर येथे स्पर्धेचा समारोप होणार असून सायंकाळी ०५.०० वा. ते ०६.०० वा. या वेळेत बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.
मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने धावपटू, मान्यवर, नागरिक व प्रेक्षक सहभागी होणार असल्याने स्पर्धा सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी दि. २६/०७/२०२६ रोजी विविध मार्गांवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
जेजुरी मार्गे बारामती किंवा केंजळगाव चौफुल्याकडे जाणारी वाहतूक जेजुरी, बेलसर फाटा, पारगाव, मेणगाव, सुपा मार्गे बारामती किंवा केंजळगाव चौफुल्याकडे वळविण्यात येणार आहे. बेलसर मार्गे जेजुरी शहराकडे जाणारी वाहतूक सोनोरी, किरोलीवाडी, जेजुरी या पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
दि. २६/०७/२०२६ रोजी सकाळी ०४.०० वा. ते दुपारी १२.०० वा. या कालावधीत वाघापूर किंवा पारगाव मार्गे सातारा बाजूकडे जाणारी सर्व वाहतूक वाघापूर, पारगाव, पिसुर्टी, नारुंगी, सुपा, लोणी भापकर, कोरेगाव, सांगवी, फलटण मार्गे सातारा, लोणंद अथवा अजिंक्यतारा पेठेकडे वळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बेलसर गाव कोळेवाडी चौकातून साताराकडे जाणारी वाहतूक कोळेवाडी गाव, पांढरेघर, सुपा, लोणी भापकर, कोरेगाव, सांगवी, फलटण मार्गे सातारा किंवा लोणंदकडे वळविण्यात येईल.
सुपा पोलीस स्टेशन हद्दीत पुणे बाजूकडून बारामतीकडे येणारी वाहतूक पुणे, सासवड, बेलसर फाटा, जेजुरी, पारगाव चौक, सुपा, उंडवडी मार्गे बारामतीकडे वळविण्यात येईल. बारामतीकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक बारामती, उंडवडी, सुपा, सासवड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येईल. केंजळगाव चौफुल्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक केंजळगाव चौफुला, सुपा, नारोळी, कारखेल, उंडवडी, बारामती मार्गे साताऱ्याकडे वळविण्यात येईल. निरा गावाकडून येणारी वाहतूक निरा, बारामती, उंडवडी, सुपा, पाटस, सोलापूर महामार्ग या मार्गाने वळविण्यात येईल.
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत विराट हॉटेल, खंडोबानगर, कसबा, गुणवडी रोड, कुडगाव चौक, निमगाव चौक, निरा रोड हा स्पर्धेचा मार्ग असून स्पर्धेचे अंदाजे ५ कि.मी. अंतर बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत आहे. पोलीस निरीक्षक, बारामती शहर यांनी आयोजक आर्यन स्पोर्ट्स यांच्या प्रतिनिधींसमवेत स्पर्धेच्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक वाहतूक नियोजन केले आहे.
दि. २६/०७/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वा. ते सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत किंवा स्पर्धा पूर्ण होईपर्यंत मॅरेथॉन मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल. बारामती शहरातून निमगावकडे जाणारी वाहतूक फलटण चौक, शिरस रोड, माळवाडी देवी, कोर्ट कॉर्नर मार्गे निमगाव रोडकडे वळविण्यात येईल. निमगावकडून बारामती शहराकडे येणारी वाहतूक कोर्ट कॉर्नर, माळवाडी देवी, शिरस रोड मार्गे फलटण चौकाकडे वळविण्यात येईल.
पाटस रोड किंवा देशपांडे चौकाकडून येणारी वाहतूक रेल्वे ब्रिज उतरल्याबरोबर रेल्वे रुळालगतच्या मार्गाने मेहता हॉस्पिटल, महिला हॉस्पिटल मार्गे एमआयडीसी रोडकडे वळविण्यात येईल. निमगाव रोडकडून पाटसकडे जाणारी वाहतूक सय्यद चौक, देशमुख चौक मार्गे पाटस रोडकडे वळविण्यात येईल.
तीन हत्ती चौक ते सय्यद चौक हा मुख्य मार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सदर मार्गालगत असलेल्या निवासी भागातील नागरिकांनी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडचा वापर करावा.
पुणे बाजूकडून निमगावकडे जाणारी वाहतूक महात्मा फुले चौकातून कसबा गणेशकडे न पाठविता महात्मा फुले चौक, देशमुख चौक, सातव चौक, रेल्वे ओव्हरब्रिज, मेडिक्लिन हॉस्पिटल मार्गे पुढे वळविण्यात येईल.
सदर स्पर्धेदरम्यान वाहतूक नियंत्रणासाठी विराट हॉटेल, खंडोबानगर, कसबा, गुणवडी रोड, कुडगाव चौक, निमगाव चौक, फलटण चौक, कोर्ट कॉर्नर, सय्यद चौक, देशमुख चौक, महात्मा फुले चौक, तीन हत्ती चौक व इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी, होमगार्ड व स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत.
स्पर्धेदरम्यान कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ उपचार उपलब्ध होण्यासाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल, शासकीय आरोग्य यंत्रणा तसेच १०८ रुग्णवाहिका सेवेशी समन्वय साधण्यात आलेला आहे.
सर्व नागरिक, वाहनचालक, व्यापारी व स्थानिक रहिवाशांनी प्रवासाचे आगाऊ नियोजन करावे, मॅरेथॉन मार्गावर अनावश्यक वाहन आणू नये, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलीस व बंदोबस्तावरील अधिकारी यांच्या सूचनांचे पालन करावे. रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन वाहनांना तात्काळ मार्ग द्यावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलीस प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
बारामती शहर पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
(श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी)
पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण