आदित्य ठाकरे : खरा जनरल डायर कोण? हे अद्याप कळू शकलेले नाही…

Photo of author

By Sandhya

आदित्य ठाकरे

आमचे सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे आता कुठे आहेत? त्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा,’ अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप, मिंधे आणि अजित पवार गटाच्या सरकारला सुनावले.

‘मुळात जालन्यातील लाठीचार्ज कोणाच्या सांगण्यावरून झाला? त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यामागील खरा जनरल डायर कोण? हे अद्याप कळू शकलेले नाही,’ असेही ते म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-युवासेना आयोजित ‘युवा खेळ समिट-२०२४’ या दोनदिवसीय स्पर्धांचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर रेल्वे स्थानकावरून अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांचा फोटो ट्विट केला असल्याबद्दलच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी, ‘मी त्यांचे ट्विट बघितले नाही. त्यांना फॉलोही करीत नाही,’ असे सांगितले.

युवासेनेचे सूरज चव्हाण यांच्या अटकेबाबत ते म्हणाले, ‘संबंधित कंपनीचे मालक मिंधे गटात आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. मात्र, निष्ठावान राहणार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना टार्गेट केले जात आहे.’

‘वन नेशन-वन इलेक्शन’च्या मुद्द्याची त्यांनी खिल्ली उडविली. राज्यात स्थानिक निवडणुका झाल्या नाहीत. पुणे, चंद्रपूर लोकसभेची निवडणूक होत नाही. सरकर जनतेचा आवाज ऐकायला तयार नाही. महाराष्ट्रात लोकतंत्रच संपविले जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.  

Leave a Comment

You cannot copy content of this page