उपमुख्यमंत्री अजित पवार : ‘मराठ्यांनी थांबावे, ही सरकारची इच्छा’…

Photo of author

By Sandhya

उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करीत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य काहींना त्यांच्याकडे चर्चेसाठी पाठविले होते. या प्रक्रियेला वेळ जात आहे. त्यामुळे आणखी वेळ देण्याची मागणी केली होती.

परंतु, मराठा समाज ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने जरांगे पाटील यांच्यासह मुंबईला चालला आहे. अजूनही त्यांनी थांबावे, अशी सरकारची इच्छा आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाबाबत राज्य सरकार काय करीत आहे, हे सांगितले.

राज्य सरकारच्या कामाला प्रतिसाद द्यावा, मुंबईकडे कूच करू नये, असे आवाहन केले. मागासवर्ग आयोगासंदर्भातील माहिती काढण्यासाठी काही वेळ लागतो.

परंतु, जरांगे पाटील हे ’जेवढा वेळ पाहिजे तेवढा दिलेला आहे,’ असे सांगत मुंबईकडे निघाले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.

संविधानाचा आदर राखून प्रत्येक जण आपला निर्णय घेऊ शकतो. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यांनी अजूनही थांबावे, अशी सरकारची इच्छा आहे. परंतु, आज मराठा समाज ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. शेवटी प्रत्येकाला आपापली भूमिका घेण्याचा अधिकार आहे.

Leave a Comment