‘‘घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे मुंबई महापालिका प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते.
घाटकोपरच्या घटनेतील होर्डिंग माफियांना भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरकारचे संरक्षण आहे. या घटनेप्रकरणी राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेवरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा,’’ अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
ते म्हणाले की, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू तर जवळपास ८८ जण जखमी झाल्याची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे.
या घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असली तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. ही रक्कम वाढवून दिली पाहिजे तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेने केला पाहिजे.