
सुदैवाने दुर्घटना टळली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा निष्काळजीपणा
हडपसर:- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिवेघाटामध्ये आज (गुरुवार, दि. २४) सायंकाळी दरड कोसळली. सुदैवाने दुर्घटना टळली. काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेले दगड, मुरूम बाजूला केल्यानंतर वाहतूक संथगतीने सुरू झाली.
पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दिवेघाटातील कामांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा दाखविला जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून दिवेघाटाच्या डागडुजीबाबत ओरड होत होती.
मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते. त्याचाच परिणाम म्हणून आज सायंकाळी गर्दीच्या वेळी घाटात मोठी दरड कोसळली. सुदैवाने या वेळी घटनास्थळाजवळून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
दरड कोसळल्यानंतर घाटात आलेल्या मोठमोठ्या दगडांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने दरड कोसळली असल्याचे म्हटले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्ग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. घटनेनंतर पोलीस बराच वेळ पोहोचू न शकल्याने नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.