

तेरवीच्या कार्यक्रमाला पर्यावरणाची जोड
पाहुण्यांना बेल-तुळस आणि फळझाडांची रोपे भेट
अमरावती (प्रतिनिधी) : “झाड जगवणे हीच खऱ्या अर्थाने मृतात्म्याला श्रद्धांजली आहे. आपण लावलेले एक झाड उद्या कुणाच्या माथ्यावर सावली देईल, कुणाला गोड फळ देईल, एखाद्या पक्ष्याला निवारा देईल आणि असंख्य जीवांना शुद्ध हवा देईल…” या हृदयस्पर्शी शब्दांतून ह.भ.प. श्री. रामकृष्ण महाराज अकोटकर यांनी बोराळा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे स्व. श्री. प्रकाशराव विश्वनाथराव चौधरी यांच्या तेरवीच्या कार्यक्रमाला अनोखी पर्यावरणपूरक जोड देण्यात आली. पारंपरिक धार्मिक विधींसोबत ह.भ.प. श्री. रामकृष्ण महाराज अकोटकर यांच्या भावपूर्ण कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या कीर्तनातून त्यांनी उपस्थित ग्रामस्थ, नातेवाईक आणि पाहुण्यांना पर्यावरण संरक्षणाची जाणीव करून देत, “प्रत्येक कुटुंबाने आपल्या आनंदाच्या अथवा दुःखाच्या प्रसंगी किमान एक तरी झाड लावून ते जगवावे,” असे भावनिक आवाहन केले.
कीर्तनातून संतविचारांचा दाखला देत महाराज म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी वृक्ष-वेली, वनचर आणि निसर्गाशी असलेले माणसाचे अतूट नाते अधोरेखित केले आहे. वृक्ष-वेली आणि वनचर हे आपले सगेसोयरे आहेत, ही संतांची शिकवण आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात अधिकच मोलाची ठरते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील “भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे” ही प्रार्थना केवळ मानवी सुखापुरती मर्यादित नसून सर्व जीवांमध्ये मैत्री, करुणा आणि विश्वकल्याणाची भावना जागवणारी आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेत ग्रामस्वच्छता, ग्रामविकास, निसर्गसंवर्धन आणि सार्वजनिक संपत्तीचे जतन यांना सामाजिक जबाबदारीशी जोडले आहे. संतांच्या या विचारांना कृतीची जोड देत चौधरी परिवाराने आज समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.
तेरवीसाठी आलेल्या पाहुण्यांना विविध वृक्षांची रोपे प्रेमपूर्वक भेट देण्यात आली. यामध्ये ७१ बेलवृक्षांची रोपे, ७१ तुळशीची रोपे, ७१ सीताफळ, ७१ आंबा, ७१ फणस, ७१ पेरू, ७१ कवठ, ७१ कडुनिंब तसेच चारोळी आदी विविध वृक्षांच्या रोपांचा समावेश होता. या उपक्रमामुळे तेरवीचा कार्यक्रम हा केवळ एका कुटुंबाचा शोकप्रसंग न राहता, पर्यावरण संवर्धनाची सामाजिक चळवळ बनविण्याचा प्रयत्न ठरला.
यावेळी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुणभाऊ सपकाळ, श्रीमती उषा प्रकाशराव चौधरी, विजया रोडे, साधना खुळे, निर्मला आखरे, शोभा तायडे, पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी, मंगेश चौधरी, संत गाडगे बाबा बालगृहाचे व्यवस्थापक गजानन देशमुख, राज्य वन्यजीव बोर्डाचे माजी सदस्य यादव तरटे पाटील, डॉ. शिरीष नाईक, सुनील कडू, विनाकायराव कडू, रितेश वानखडे, मनोज पाटील तायडे यांच्यासह गावातील नागरिक, नातेवाईक आणि पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :
पर्यावरणाशी बांधिलकी जोपासली – अरुणभाऊ सपकाळ
“आजच्या काळात झाड लावण्यापेक्षा झाड तोडले जाण्याचे चित्र आपल्या समोर आहे. विकासाच्या नावाखाली असो अथवा अन्य कोणत्याही कारणाने, वृक्षतोड सुरू आहे. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या स्मृती केवळ अश्रूंनी नव्हे, तर हिरवाईने जपण्याचा संकल्प मी प्रथमच अनुभवत आहे.”
“स्व. श्री. प्रकाशराव विश्वनाथराव चौधरी यांच्या तेरवीच्या कार्यक्रमाला एका वेगळ्या, समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक संकल्पाची जोड देण्यात आली आहे. नातेवाईक व पाहुण्यांना वृक्षांची रोपे भेट देऊन चौधरी परिवाराने पर्यावरणाशी असलेली आपली बांधिलकी कृतीतून जपली आहे. या रोपांचे संवर्धन झाले, तर आज दिलेली ही छोटीशी भेट उद्या मोठ्या हिरवाईत रूपांतरित होईल,” अशी भावना पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुणभाऊ सपकाळ यांनी व्यक्त केली.
