ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा शुक्रवारपासून सुरु होत्या. मात्र मी कुठेही जाणार नसून, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दानवे म्हणाले की, माझ्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवण्यात आलेल्या आहेत. मी निष्ठावान शिवसैनिक आहे. माझ्या तीस वर्षांच्या निष्ठेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या दिवशी खैरेंची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी नाराजी असू शकते, रोज रोज नाराजी नसते.
”शिवसेना-भाजपचे विचार जुळतात, कारण २५ वर्षे आम्ही एकत्रित काम केललं आहे. परंतु शिवसेनेचा वेगळा बाणा आहे, त्यानुसार आम्ही काम करत आहोत. उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी मी काम करणार आहे.” अशी भूमिका दानवेंनी स्पष्ट केली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं की, शिवसेना आणि भाजपचे विचार एकच आहेत.. अंबादास दानवे हे आमच्याच विचारांचे आहेत. त्यावर अंबादास दानवेंनी शिवसेनेचा बाणा वेगळा असल्याचं म्हटलं. आपण कुठेही जाणार नसल्याचं दानवेंनी सांगितलं आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
मी ३० वर्षांपासून सेनेच काम करतोय
आम्ही भाजपासोबत होतो म्हणून त्यांच्यासोबत गेलो असं होत का ?
मी स्टार प्रचारक आहे, पक्षासाठी संपूर्ण राज्यात मी फिरणार आहे
मी इथे बसून जिल्ह्यात काम सुरु आहे, अशी यंत्रणा आमची आहे
मी अनेक गावात फिरुन आलोय, अजून बऱ्याच गावात मी जाऊन दौरा करणार आहे
चंद्रकांत खैरे आणि मी दोघांनी देखील तिकीट मागितलं होतं, एवढाच काय तो विषय
आता आम्ही खैरेंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत.