शरद पवार : भाजपकडून आता उमेदवारांचीही पळवापळवी…

Photo of author

By Sandhya

शरद पवार

सातारा लोकसभेसाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी जी नावे सुचवली आहेत त्यापैकी एकाचे नाव पार्लमेंटरी बोर्डाकडून निश्चित होईल. माढ्यात धनगर समाजाचा उमेदवार द्यायचा होता. महादेव जानकर यांच्याशी सकारात्मक चर्चाही झाली, परंतु, भाजपने ऐनवेळी उमेदवार पळवला, अशी टीका खा. शरद पवार यांनी केली.दरम्यान, खा. उदयनराजेंकडून कसलाही प्रस्ताव आला नाही.

त्यांना सोबत घेण्याचे काहीच कारण नाही, ते तर भाजपाचे उमेदवार असल्याचे सांगत उदयनराजे यांच्याबाबतच्या चर्चांना पवार यांनी पूर्णविराम दिला.सातारा येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, राजकुमार पाटील उपस्थित होते.

यावेळी खा. शरद पवार म्हणाले, खा. श्रीनिवास पाटील असेपर्यंत आमच्यापुढे अडचणी नव्हत्या. परंतु, त्यांची उमेदवारी नसल्याने प्रत्यक्ष जिल्ह्यात येऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी कार्यकर्त्यांना माझ्या आणि खा. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीचा आग्रह सोडण्यास सांगितले आहे.

इतर पर्यायांबाबतही मते जाणून घेतली आहेत. यामध्ये आ. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर आणि खा. श्रीनिवास पाटील यांची नावे कार्यकर्त्यांनी सुचवलेली आहेत. ही नावे पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या समोर ठेवणार आहे. या नावांबाबत विचारविनिमय केला जाईल.

देशामध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी तसेच डावे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआयचे काही घटक व अन्य प्रादेशिक पक्ष यांच्यासमवेत बसून उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येत आहेत.

निवडणुकीतून लोकांसमोर जाताना भला मोठा अजेंडा सांगण्यापेक्षा इंडिया आघाडीचे सर्व पक्ष हे शेतकरी, सर्वसामान्य व युवकांसाठी ठोस कार्यक्रमाची आखणी करतील, असेही पवार म्हणाले.खा. उदयनराजेंकडून कसलाही प्रस्ताव आला नाही. त्यांना सोबत घेण्याचे काहीच कारण नाही. ते तर भाजपचे उमेदवार आहेत, असे सांगत खा. पवार यांनी उदयनराजेंच्या स्टाइलमध्ये कॉलरही उडवून दाखवली.

बाळासाहेब पाटील की शशिकांत शिंदे?सातारा लोकसभेसाठी उमेदवार कोण आ. बाळासाहेब पाटील की शशिकांत शिंदे असा प्रश्न विचारला असता खा. शरद पवार म्हणाले, हे दोघे माझे उजवे व डावे हात आहेत. त्यांची सर्व शक्ती पक्षाच्या पारड्यात टाकणार असल्याचे सांगत सातारा लोकसभा कोण लढवणार याचा सस्पेन्स कायम ठेवला.

उमेदवार आघाडीचा, पण जागा राष्ट्रवादीचीसातारा लोकसभा लढणारा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असणार आहे. तथापि, जागावाटपात ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा असल्याचे खा. शरद पवार यांनी स्पष्ट करत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या संभाव्य उमेदवारीबाबतचे शंका निरसन दूर केले. श्रीनिवास पाटील यांचे आजारपण राजकीय नाहीखा.

श्रीनिवास पाटील यांचे आजारपण ‘राजकीय’ असल्याची चर्चा असल्याबाबत छेडले असता खा. पवार म्हणाले, त्यांच्या प्रकृतीची तुमच्यापेक्षा मला थोडी जास्त माहिती आहे. निवडणुकीची धकाधकी त्यांना सहन होणार नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. शिवसेनेने सांगलीची जागा परस्पर जाहीर केली असली तरी याबाबत महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही.

प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयने क्लीन चिट दिली. जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले बरे असेच बोलले जातंय. माढ्यासाठी उच्चशिक्षित असलेल्या अनेकांचे अर्ज आहेत. त्याठिकाणी सामाजिक समतोल राखून उमेदवार देणार आहोत.

Leave a Comment