एपीएमसीच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक घटली

Photo of author

By Sandhya

एपीएमसी बाजारात फेब्रुवारी-मार्चमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत तीन ते चार पटीने आवक वाढली होती. मात्र आता आवक कमी होत असून मागील वर्षी एप्रिलमध्ये साधारणता एक लाख पेट्या दाखल झाल्या होत्या , मात्र आता ३५ हजार पेटी दाखल झालेली आहे.

तर दुसरीकडे इतर राज्यातील आंब्याची आवक मात्र वाढली आहे.एपीएमसी बाजारात जानेवारी फेब्रुवारी महिना सुरू होताच अवीट गोडी करता प्रसिद्ध असलेला हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. यंदा अवकाळी पावसाने हंगामाला उशिराने सुरुवात झाली,परंतु उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.

मात्र हवामान बदल आणि पुन्हा पडलेल्या अवकाळी पावसाने उत्पादन खराब होण्याच्या भीतीने हापुस आंबा शेतकऱ्यांनी वेळे आधीच आंब्याची तोडणी केली. त्यामुळे एपीएमसी बाजारात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दरवर्षीपेक्षा अधिक उत्पादन दाखल होत होते. त्यामुळे दरात देखील घसरण झाली होती.

परंतु आता मागील वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत हापूस आवक कमी होत असून १५ एप्रिलनंतर आवक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षी एप्रिल पासून एपीएमसीत हापूसच्या एक लाख पेट्या दाखल होत होत्या परंतु आज गुरुवारी बाजारात हापुसच्या ३५ हजार ७९८ पेट्या तर इतर आंब्यांच्या ३१ हजार ५९५ पेट्या दाखल झाले आहेत.

त्यामुळे दरात २००-४००रुपयांनी वाढ झाली असून प्रति पेटी २हजार ते ४ हजार रुपयांनी विक्री होत आहे. तर इतर आंबे यामध्ये बदामी प्रतिकिलो ७०-९०रुपये, लालबाग ६०-७०रुपये तर कर्नाटक हापूस ८०-१५०रुपये किलोने उपलब्ध आहे.

Leave a Comment