Bal Bhavan renovated building inauguration ceremony: Education Minister to review preparations and important work today

Photo of author

By Sandhya

बालभवन नूतनीकृत इमारत लोकार्पण सोहळा: शिक्षण मंत्र्यांकडून आज पूर्वतयारीचा व महत्वपूर्ण कामाचा सखोल आढावा

मुंबईतील चर्नी रोड येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन’ या संस्थेच्या नूतनीकृत इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा उद्या (२५ मे) संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दादाजी भुसे यांनी आज बालभवन संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आणि विविध कामकाजाचा सखोल आढावा घेतला. उद्याचा सोहळा अत्यंत देखणा आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यांनी प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना केल्या.
उद्या संपन्न होणारा हा लोकार्पण सोहळा राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात पाहता शिक्षण मंत्र्यांनी आज स्वतः बालभवनच्या नूतनीकृत इमारतीची पाहणी केली. यामध्ये तळमजल्यावरील अत्याधुनिक प्रेक्षागृह , पहिल्या मजल्यावरील नृत्य दालन, नाट्य कक्ष आणि संगीत कक्ष, तसेच दुसऱ्या मजल्यावरील सादरीकरण व्यासपीठ व चित्रकला दालन या सर्व अत्याधुनिक सुविधांची त्यांनी बारकाईने पाहणी केली.
या प्रसंगी मंत्री श्री.दादाजी भुसे म्हणाले, “जवाहर बालभवनला ७० वर्षांपेक्षा जास्त मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या अमृत महोत्सवी वाटचाल करणाऱ्या संस्थेच्या इमारतीचा शासनाने सुमारे ८.५० कोटी रुपये खर्च करून कायापालट केला आहे. उद्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासीक सोहळा संपन्न होत असून, ही वास्तू महाराष्ट्रातील बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे एक हक्काचे व्यासपीठ ठरेल.”
पाहणी दरम्यान मंत्री महोदयांनी उद्याच्या सोहळ्यासाठी येणारे निमंत्रित मान्यवर, शिक्षक, मुख्याध्यापक आणि विशेषतः बालगोपाळांची आसनव्यवस्था उत्तम असावी, संपूर्ण परिसर सुसज्ज आणि स्वच्छ असावा. तसेच दिव्यांग बालकांसाठी करण्यात आलेल्या विशेष सुविधांची आणि स्वच्छतागृहांची चोख व्यवस्था ठेवावी., अशा सूचना केल्या.तसेच उद्या होणाऱ्या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई’ आणि बालभवन यांच्यातील ऐतिहासिक सामंजस्य कराराची (MoU) सर्व तांत्रिक व प्रशासकीय तयारी पूर्ण ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या आढावा बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, बालभवनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page