Tanker transporting illegal diesel under the guise of edible oil seized near Kharegaon toll plaza

Photo of author

By Sandhya

खारेगाव टोलनाक्याजवळ एडिबल ऑईलच्या नावाखाली बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त

४६.५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे निर्देश

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे.
खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
लोकांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित टँकरवर ‘ईडीबल ऑईल’ (खाद्यतेल) असे लिहिण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी चालकासह एकूण ८ जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा घटक-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर, मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचण्यात आला होता. या ठिकाणी संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर (क्रमांक MH-46-BB-7134) थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव पदार्थ आढळून आला. टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपनियंत्रक शिधावाटप विभाग, ठाणे यांच्या आदेशानुसार शिधावाटप अधिकारी श्री. सुभाष रामनाथ डुंबरे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
या संयुक्त तपासणीत टँकरच्या ५ कप्प्यांमध्ये एकूण २५,००० लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये २४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५,००० लिटर डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थाचा आणि २२ लाख रुपये किमतीच्या टाटा टँकरचा समावेश आहे.
नियमानुसार तपासणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून रासायनिक चाचणीसाठी नमुने गोळा केले असून, टँकर व इतर मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
प्राथमिक तपासणीत महत्वाची माहिती समोर आली असून सर्व आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून विरार खाडीच्या किनारी बोटीमधून आणलेले डिझेल टँकरमध्ये भरले होते आणि ते नाशिकच्या दिशेने घेऊन जाण्याचा त्यांचा बेत होता. पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करण्याचे कोणतेही वैध मापदंड न पाळता, सामान्य टँकरमधून अशी धोकादायक वाहतूक करून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण करण्याचे कृत्य आरोपींनी केले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेल (वय ३७ वर्षे, रा. वाशी, नवी मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. तसेच टँकर मालक रितेश अभय नारायण सिंग (रा. दिवा, ठाणे) यांच्यासह पालघर व सुरत येथील रोशन शिरोडकर, नितीन कोली, राजू पंडित, दीपक पवार, सागर पाटील आणि अनिल सुरत या इतर ७ साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत.
शिधावाटप अधिकारी श्री. सुभाष रामनाथ डुंबरे यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, मोटार स्पीरीट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर २००५ आणि बायोडिझेल धोरण २०२१ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक रावजी उतेकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
या मोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जाहीर आवाहन केले आहे की, जिल्ह्यात डिझेल व तत्सम इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जनतेने कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त इंधन साठा करून ठेवू नये आणि इंधनाच्या तुटवड्याबाबत पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाकडून अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page