बंधन बँकेला 34 लाख 15 हजार रुपयांना फसविले

Photo of author

By Sandhya

बंधन बँकेला 34 लाख 15 हजार रुपयांना फसविले

बंधन बँकेतील दोन कर्मचार्‍यांनी 114 कर्जदारांच्या माध्यमातून बँकेला 34 लाख 15 हजार रुपयांना फसविले आहे. याबाबत करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तिघा संशयिताविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

बंधन बँकेचे व्यवस्थापक सुजित विश्वास, कॅशियर शिफा शेख तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील एक महिला या तिघा संशयित आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याची फिर्याद बंधन बँकेच्या औरंगाबाद विभागाचे विभागीय व्यवस्थापक मयूर भास्कर निखार यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे. मयूर निखार यांच्या फिर्यादीनुसार बंधन बँकेच्या 114 कर्जदारांना बंधन बँकेच्या माध्यमातून पन्नास लाख तीस हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते.

114 कर्जदारांकडून 1 हजार ते 3 हजार रुपयांची अशी दोन लाख 32 हजार रुपयांची कपात करुन ठेव म्हणून खात्यात ठेवण्यात आली होती. यातील 114 कर्जदारांना मंजूर कर्जापैकी फक्त 13 लाख 83 हजार रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले होते. उर्वरित 34 लाख 15 हजार रुपयांचे वाटप न करता या तिघांनी मिळून त्या रकमेचा अपहार केला आहे.

या तिघांनी 114 कर्जदारांमधून काहींना 40 हजार, तर काहींना 45 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्या कर्जापोटी चाळीस हजार रुपये मंजूर झालेल्या कर्जदारांना 4 हजार, 45 हजार रुपये मंजूर झालेल्या कर्जदारांना 13 हजार रुपयांचे वाटप केले होते.

असे 34 लाख 15 हजार रुपयांचे वाटप या कर्जदारांना न करता त्यांनी त्याचा अपहार केला आहे, अशी फिर्याद मयूर निखार यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे. याबाबत तिघा संशयित आरोपींविरोधात करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एम. एन. जगदाळे हे करत आहेत.

Leave a Comment