भाजपच्या महिला नेत्या सना खान काही दिवसांपासून बेपत्ता; हत्येचा संशय…

Photo of author

By Sandhya

सना खान

 नागपूर शहरातील भाजपच्या महिला नेत्या सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर मानकापूर पोलीस पथक जबलपूरकडे रवाना झाले असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.

मात्र, आठवडा उलटूनही थांगपत्ता लागलेला नाही. दरम्यान, व्यावसायिक स्पर्धेतून हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांपुढे देखील या प्रकरणी तपासाचे मोठे आव्हान आहे.

सना ही १ऑगस्टला आपल्या मित्रांसोबत जबलपूरला गेली होती. तिने सकाळी जबलपूरवरून पोहचली असल्याचे घरी फोन करून सांगितले. त्यानंतर मात्र तिचा फोन बंद झाला. यानंतर तिच्या आईने, घरच्या लोकांनी नागपुरातील मानकापूर पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली असून नागपूर पोलिसांनी दोन टीम जबलपूरला सना हिचा शोध घेण्यासाठी रवाना केल्या आहेत, अशी माहिती राहुल मदने, डीसीपी झोन ​​२ यांनी दिली.

दरम्यान, कधीकाळी व्यावसायिक संबंध असलेल्या जबलपूर येथील पप्पू शाहू नामक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाने सना खानला जीवे मारण्याची यापूर्वी धमकी दिली होती, अशी माहिती समोर येत आहे.

शाहू याचा एक ढाबा देखील असून तो देखील आपल्या सहकाऱ्यांसह गेले काही दिवस बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment