मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : राज्यातील आठ कोटी नागरिकांना लाभ! ‘शासन आपल्या दारी’

Photo of author

By Sandhya

राज्यातील आठ कोटी नागरिकांना लाभ! ‘शासन आपल्या दारी’

‘शासन आपल्या दारी’ हा ऐतिहासिक प्रकारचा हा उपक्रम आहे. दीड कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमात लाभ घेतला आहे. या उपक्रमांद्वारे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राज्यातील सात ते आठ कोटी नागरिकांना या उपक्रमांतर्गत लाभ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी या वेळी उपस्थित होते.

‘या उपक्रमांतर्गत राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक आणि पुणे जिल्ह्यातील २२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ देण्यात आला आहे. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

१२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिले आहेत. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही सहा हजार रुपयांची भर घालणार असल्याने १२ हजार रुपये इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात ७०० ठिकाणी सुरू केला आहे. पोटदुखी होणाऱ्यांना तेथे मोफत उपचार देण्यात येतील. केवळ राज्यातील नागरिकच नव्हे, तर राज्यातील विकास पाहून पोटात दुखणाऱ्यांसाठी देखील योजना आणल्या आहेत’, असा टोला विरोधकांचे नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी लगावला.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत नेण्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्याला केवळ एक रुपयात पीक विमा सुविधा दिली आहे. ‘लेक लाडकी’ योजनेंतर्गत कुटुंब लखपती होईल अशी योजना सुरू केली आहे.

महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडीसेविकांच्या मानधनात वाढ केली आहे.’

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. ८० हजार कोटींची कामे केंद्र सरकारच्या सहकार्याने होत आहेत. विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही.

‘मास्टर ब्लास्टर’ देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मस्टर मंत्री अशी टीका झाली. टीका करणाऱ्यांना काही वाटायला हवे होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना तुमचे एकही काम अडवले नाही. प्रत्येक काम केले. फडणवीस मस्टर नव्हे, तर मास्टर-ब्लास्टर देवेंद्र फडणवीस आहेत. ते कधी चौकार, तर कधी षटकार मारतात आणि कधी कधी विकेटही घेतात. बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांना गयाराम म्हणायचे का, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

Leave a Comment