
जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक दृष्टिकोन, चलनव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य याविषयीचे विचार आजही कालसुसंगत आहेत. जागतिक पातळीवर अर्थकारणात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधिक असल्याचे सांगून जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील त्यांच्या संशोधनातून डॉ. आंबेडकरांनी भारतात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या विचारांवर आधारितच पुढे रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. तसेच ‘गोल्ड स्टँडर्ड’ आणि चलनाच्या खरेदी शक्तीबाबत त्यांनी मांडलेले विचार आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतही मोलाचे ठरत आहेत. त्यांच्या ‘प्रॉब्लेम्स ऑफ रुपी’ या प्रबंधातून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया रचला गेला. १९२३ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक विचारांच्या आधारावरच आज जग वाटचाल करत आहे. त्यांच्या प्रबंधात मांडलेल्या तत्त्वांवरच भारताची अर्थव्यवस्था उभी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.