Chaityabhoomi is the energy center of Babasaheb’s thoughts – Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar

Photo of author

By Sandhya

चैत्यभूमी बाबासाहेबांच्या विचारांचे ऊर्जा केंद्र -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही प्रेरणा, संकल्प आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तसेच त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉ. आंबेडकर यांच्या मानवकल्याणाच्या विचारांना पुढे नेणे आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण व वेगवान विकास साधणे हेच त्यांना खरे अभिवादन असल्याचे त्यांनी सांगितले. चैत्यभूमी ही बाबासाहेबांच्या विचारांचे ऊर्जा केंद्र असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. एकता, समता आणि बंधुता या मूल्यांमध्ये समाजाला बांधून त्यांनी प्रत्येकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांची मशाल सतत तेवत ठेवून त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे. इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक जगाला शांतता आणि समतेचा संदेश देणारे केंद्र ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी पुष्प अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एक वर्षाच्या कामकाजावर आधारित ‘समाजनायक संजय शिरसाट’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकर, आमदार दीपक केसरकर, आमदार सना मलिक, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page