मराठा आरक्षण प्रश्नी मागील १७ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि. १४) अखेर उपोषण मागे घेतले आहे. जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन उपोषण सोडले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अंतरवाली सराटीत आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी फळाचा रस घेऊन उपोषण मागे घेतले.
मुख्यमंत्री शिंदेंसह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर आदी आंदोलनस्थळी हजर आहेत.
समाजाच्या हिताचा निर्णय जोपर्यंत घेतली जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी मी भूमिका घेतली होती. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कोणाकडे आहे तर ती एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. या मतावर मी ठाम आहे, अशी ग्वाही जरांगे पाटील यांनी आज मराठा समाज बांधवांना दिली.
मराठी समाजाशी गद्दारी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंच समाजाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालयात आरक्षण टिकलं.
पण सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केलं. त्यावर आता भाष्य करत नाही. पण मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलनस्थळी बोलताना सांगितले.
मराठा समाज शिस्तप्रिय आहे. लाठीमारीची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत गावकऱ्यावरील गुन्हे तातडीने मागे घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.