चंद्रशेखर बावनकुळे : राज्यभरात भाजपचे ३० हजार सुपर वॉरिअर्स

Photo of author

By Sandhya

राज्यभरात भाजपचे ३० हजार सुपर वॉरिअर्स

भाजपा राज्यभरात ३० हजार सुपर वॉरिअर्स तयार करणार असून ते पुढील १३ महिन्यात दररोज तीन तास काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या विजयाचे शिल्पकार होतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

नागपूर लोकसभा प्रवासात त्यांनी सर्व सहा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स (प्रमुख पदाधिकारी) यांच्याशी संवाद साधला. शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभागृहात पूर्व व मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.

त्यानंतर दक्षिण व दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये पश्चिम व उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्सशी चर्चा केली.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, पंचायत ते लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सुपर वॉरिअर्स ५१ टक्के मतांचे नियोजन करतील. मोदी सरकारने प्रत्येक बुथवर विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांना एक ते दीड कोटी रुपयांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ दिला आहे.

कोविड लसीकरण, आयुष्यमान भारत, मोफत अन्न योजना, किसान सन्मान निधी व आता विश्वकर्मा योजना अशा योजनांतून हा फायदा झाला आहे. चांद्रयान मोहीम व जी २० मुळे भारताचा जगभरात वाढलेला सन्मान हा भाजपा कार्यकर्त्यांची शिदोरी आहे यावर भर दिला.

पत्रकारांशी चांगले संबंध ठेवा दरम्यान, काही दिवसांपूर्वी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या, असे बोलल्याने अडचणीत आलेल्या बावनकुळे यांनी आता पत्रकारांशी चांगले संबंध ठेवा, आपल्या चांगल्या योजना, कामे समजावून सांगा असा सावध पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले.

यावेळी मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील अनेक युवकांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, भाजपाचे विभागीय संघटन सरचिटणीस डॉ. उपेंद्र कोठेकर, नागपूर लोकसभा निवडणूक प्रमुख आ. प्रवीण दटके, शहराध्यक्ष बंटी कुकडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, माजी आ. अनिल सोले, माजी आ. मिलिंद माने, भाजपा व्यापारी आघाडी प्रदेशाध्यक्ष विक्की कुकरेजा,

भाजपा विधी आघाडी प्रदेश अध्यक्ष उदय डबले, माजी महापौर दयाशंकर तिवारी, नंदा जिचकार, माया इवनाते, मिलिंद कानडे, किशोर वानखेडे, विष्णू चांगदे, संदीप गवई, बाल्या बोरकर, श्रीकांत आगलावे,

प्रमोद पेंडके, रामभाऊ आंबुलकर, किशोर वानखेडे, डिम्पी बजाज, विलास त्रिवेदी यांच्यासह सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख, समन्वयक, मंडल अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणीतील सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment