अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
बच्चू कडू आणि आमचा थेट संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. दरम्यान, नवनीत राणांच्या उमेदवारीवरून महायुतीत वाद पेटल्याचे दिसून येत आहे.
अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती एकसंघ असल्याचा दावा केला. ते म्हणाले, बच्चू कडू यांचा वेगळा पक्ष आहे. त्यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत युती आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री स्वत: अमरावतीत निर्माण झालेला तिढा सोडवतील. पण, तरीही बच्चू कडू यांची नाराजी दूर झाली नाही, तर मतदार जे ठरवतील ते होईल. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा योग्य तो सन्मान राखण्याचा केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाचा प्रयत्न आहे.
त्यांचीही नाराजी दूर केली जाईल, असे बावनकुळे म्हणाले. अमरावतीत भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी केला आहे.
नवीन उमेदवारामुळे नाराजी असते. एका वेळी एकाच व्यक्तीला उमेदवारी मिळत असते. पण, भाजपचा एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नाराज नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.