लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एकमेकांच्या जागेवर दावा केला जात आहे. महायुतीतील पॉवर सेंटर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही पत्ता कट होऊ शकतो, असे सांगून गद्दारांना आता आमचे दरवाजे उघडे नाहीत, गद्दारांना सोबत घेतल्यास निष्ठावंतांचा अवमान होईल, असा निशाणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर साधला. ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या माध्यमातून मतांचा घोटाळा होऊ शकतो. आता जनतेचाही ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिलेला नाही. कारण कुणालाही मतदान केले तरी ते भाजपच्या कमळ चिन्हावर जाण्याची भीती आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची आमची मागणी आहे.
भाजपचे ईव्हीएमवर एवढे प्रेम कशासाठी आहे ? असा सवाल करून भारत वगळून जगातील अनेक देशातून ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया रद्द केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही वंचितला ५ जागांचा प्रस्ताव दिला होता.
परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. आम्ही आजही वंचितसोबत चर्चा करण्यासाठी इच्छुक आहे. वंचितच्या पदाधिकारी यांनी आमच्यासोबत चर्चा केली होती. आता त्यांच्या नेत्यांनीच चर्चा थांबवली आहे. आम्ही आजही त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी तयार आहोत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.