सत्ताधारी महायुतीच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन आहे. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला राहुल गांधी यांचे इंजिन आहे. त्यामुळे मतदारांनी मोदींच्या धावत्या रेल्वेत बसायचे की, राहुल गांधींच्या न चालणाऱ्या रेल्वेत बसायचे हे ठरावावे, असे प्रतिपादन भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे आयोजित एका प्रचारसभेत बोलताना केले.
फडणवीसांनी बुधवारी उत्तर मुंबईचे भाजप उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचारार्थ एक सभा घेतली. त्यात त्यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर सडकून टीका केली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याचेही स्वागत केले.
देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात हे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांना देशाला काय हवे आहे याची नाडी कळली आहे. यामुळेच त्यांनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेसला उत्तर मुंबईत उमेदवारही मिळेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत 10 वर्षांत केलेला विकास केवळ एक ट्रेलर होता.
आगामी 5 वर्षांत मोदी मुंबईसह संपूर्ण देशाचा आणखी विकास करणार आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्याकडे 25 वर्षांपासून मुंबईची सत्ता होती.
पण त्यांनी मुंबईकर व मुंबईच्या विकासासाठी कोणतेही काम केले नाही. त्यामुळे पियुष गोयल उत्तर मुंबईतून विक्रमी मतांनी निवडून येतील. परिस्थिती अशी आहे की येथे काँग्रेसला उमेदवार मिळत नाही आणि ठाकरे गटानेही ही जागा स्वतःकडे घेतली नाही, असे फडणवीस म्हणाले.