खासदार सुप्रिया सुळे : पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्र्यावर कारवाई करावी…

Photo of author

By Sandhya

खासदार सुप्रिया सुळे

नरेंद्र मोदी हे पक्षाचे नाही, तर देशाचे पंतप्रधान आहेत. एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे. ते उपस्थित असलेल्या व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय गलिच्छ भाषण केले, त्याबद्दल योग्य कारवाई करावी, ही अपेक्षा आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

पुण्यात बुधवारी सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, पंतप्रधानांनी काहीतरी अ‍ॅक्शन घ्यावी, राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे.

सगळ्याच पक्षाच्या आणि सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. गलिच्छ वाक्य बोलणं झालं हे थांबलं पाहिजे. त्याचा मी निषेध करते. माझी अपेक्षा आहे पंतप्रधान यांचा मानसन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे.

राज ठाकरे यांच्या भाजपला पाठिंबा देण्याविषयी सुळे म्हणाल्या, दहा ते पंधरा दिवस यापूर्वी ते दिल्लीला भाजपच्या मोठ्या नेत्यांना भेटले त्यावेळेस त्यांची लाईन बर्‍यापैकी स्पष्ट झाली होती. त्यामुळे कालच्या निर्णयाचे काही आश्चर्य वाटलं नाही. त्यांची मते कोणाच्या पारड्यात पडतील हे काळच ठरवेल.

मी त्यांचं भाषण काल ऐकलं नाही प्रचारात होते. विजय शिवतारेंना उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी रात्री साडेबारा वाजता एका ज्येष्ठ नेत्याचा फोन आल्याचे अजित पवार बोलले होते, त्यावर सुळे म्हणाल्या, देशात लोकशाही आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, शिवसेना नेते विजय शिवतारे यांना रात्री कोणत्या ज्येष्ठ नेत्याने फोन करून उमेदवारी मागे न घेण्याचा सल्ला दिला, याची माहिती मला नाही.

मात्र, ते कोण ज्येष्ठ नेते आहेत. जे शिवतारे यांना थांबा म्हणत होते. हे मलाही समजायला आवडेल, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. दुष्काळी परिस्थितीवर सुळे यांनी पुन्हा भाष्य करत म्हणाल्या, डिसेंबरपासून मी सातत्याने दुष्काळी परिस्थितीबाबत बोलत आहे.

शेतकरी मजूर अडचणीत आहेत. माझ्या मतदारसंघातील धरणामधे एक थेंब पाणी नाही. संपूर्ण महाराष्ट्रात 35 टक्के पाणी शिल्लक आहे. पाणी पुरेल की नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. सरकारला दुष्काळाचं काही घेणं-देणं नाही, अशी टीका त्यांनी या वेळी केली.

Leave a Comment